भिवंडीत गुटखा माफियांकडून पोलिसांना मारहाण; कल्याण गुन्हे शाखेने भिवंडीत पकडला ३५ लाखांचा गुटखा
By नितीन पंडित | Published: February 24, 2023 06:51 PM2023-02-24T18:51:18+5:302023-02-24T18:52:08+5:30
भिवंडीत गुटखा माफियांकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली.
भिवंडी: भिवंडी अवैध गुटखा साठवलेल्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्याण गुन्हे शाखेच्या पथकावर गुटखा माफीयांनी हल्ला चढवीत पोलिसांना मारहाण करीत दुखापत केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. काल्हेर येथील जयराम स्मृती अपार्टमेंट या एक मजली इमारतीच्या तळमजल्यावर एका खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
त्यानंतर तेथील पोलीस पथक गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी कारवाई करण्यास गेले होते.तेथे वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा,पान मसाला,अपमिश्रकेयुक्त तंबाखू असे पदार्थ साठविल्याचे त्यासोबतच तेथील टाटा टेम्पोमध्ये अवैध गुटखाभरून ठेवलेला आढळून आला.पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली असता तेथे उपस्थित असलेले गुटखा माफिया देवाराम सखाराम चौधरी वय २६,भरत भानाराम चौधरी वय २३, जगदीश जीवाराम चौधरी सर्व रा. काल्हेर यांनी पोलीस पथकाच्या गुटखा जप्त करण्याच्या कामात अडथळा निर्माण करीत, पोलीस हवालदार अनुप अरुणोदय कामात यांचा टी-शर्ट फाडून त्यांच्या पोटावर ठोशाबुक्क्याने मारहाण करून दुखापत केली.
या घटनेनंतर कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस जबाबदार अनुप कामात यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी या तिन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ३५ लाख १० हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .