पोलीस उपनिरीक्षकास ५ हजारांचा हप्ता नक्की करणाऱ्या गुटखा तस्करास अटक
By धीरज परब | Published: January 18, 2024 06:02 PM2024-01-18T18:02:37+5:302024-01-18T18:02:50+5:30
आधीच्या पोलिसाला देखील ५ हजारांचा हप्ता देत असल्याची कबुली
मीरारोड - गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात आरोपी करू नये या साठी तसेच गुटखा पुरवठ्याचा व्यवसाय चालू देण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकाला ५ हजारांचा हप्ता नक्की करणाऱ्या गुटखा तस्करास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. विशेष म्हणजे आधी देखील एका पोलिसाला नियमित ५ हजार हप्ता देत असल्याची कबुली गुटखा तस्कराने दिली आहे .
नवघर - नया नगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त उमेश माने - पाटील यांच्या कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक आकाश इरले हे कार्यरत आहेत . गुटखा विक्री प्रकरणात डिसेम्बर मध्ये पानटपरीवाल्यांवर नवघर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत . त्या गुन्ह्यातील अटक आरोपीना गुटखा पुरवठा करणारा सुरेंद्र रामपलट चौरसिया रा . नर्मदा टेरेस , नर्मदा नगर , भाईंदर पूर्व हा आकाश यांना सातत्याने कॉल करून भेटायचे आहे म्हणून सांगत होता .
१६ जानेवारी रोजी चौरसिया हा आकाश यांना प्रत्यक्ष भेटला . आपण पान विक्रेत्यांना गुटखा पुरवत असल्याचे सांगून दाखल गुन्ह्यात आपणास पाहिजे आरोपी करू नये तसेच प्रतिबंधित गुटखा - सुगंधी पानमसाला पुरवठा व विक्री करण्यास सहकार्य करावे म्हणून महिना ५ हजार हप्ता देणार असे सांगितले . आकाश यांनी सादर प्रकरणी १७ जानेवारी रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली .
त्या दिवशी चौरसिया हा आकाश यांना भेटला . तेव्हा त्याने आपण भाईंदर पूर्वेच्या विविध भागात गुटखा - पानमसाला पुरवत असल्याचे सांगून पूर्वीचे रमाकांत साहेब हे सुद्धा दरमहा ५ हजार हप्ता घेत असल्याचे चौरसिया याने सांगितले . या शिवाय ते पान टपरीवाल्यां कडून स्वतः जाऊन घ्यायचे ते वेगळे . पूर्वी मीटर चालू होते ते पुन्हा सुरु करू असे चौरसिया म्हणाला .
चौरसिया हा पोलिसाला लाच देत असल्याची खात्री पटल्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधकम विभागाच्या उपअधीक्षक माधवी राजेकुंभार सह खान, बजागे, तेटांबे यांच्या पथकाने सापळा रचला . गुरुवारी सायंकाळी चौरसिया ह्याने जेसलपार्क येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन ५ हजार रुपये आकाश यांच्या टेबलावर देण्यास ठेवले . त्यावेळी सापळा रचून असलेल्या पोलिसांनी चौरसिया ह्याला अटक केली . नवघर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा चौरसिया वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणात चौरसिया याने नाव घेतलेल्या रमाकांत सह अनेक पोलिसांची गुटखा मधील हप्तेबाजी उघडकीस येण्याची शक्यता आहे .