शाळा परिसरात गुटखा, तंबाखूची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 05:19 AM2018-12-19T05:19:16+5:302018-12-19T05:19:51+5:30
‘कोप्टा’ कायद्यानुसार कारवाई : भिवंडीत सात लाखांचा गुटखा जप्त
ठाणे : राज्यात बंदी असतानाही शाळा, महाविद्यालयांच्या आवारात सर्रासपणे गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू आहे. याविरोधात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने विशेष मोहीम राबवून सहा महिन्यांत ‘कोप्टा’अंतर्गत सुमारे ४५० जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील नौपाडा, ठाणे रेल्वेस्थानक परिसर, घोडबंदर रोड, वर्तकनगर या परिसरात शाळा आणि महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. याच परिसरातील पानाच्या ठेल्यांवर सिगारेट, तंबाखू आणि गुटखा यांची सर्रास विक्री होते. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी ठाणे आणि भिवंडीत ही विशेष मोहीम राबवली. यामध्ये विक्री करणाऱ्यांबरोबरच अमली पदार्थांचे सेवन करणाºयांवरही कारवाई करण्यात आली.
महाराष्टÑ शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा गोदामांत बेकायदा साठा करून तो परिसरात विक्री करणाºया न्यू रॉयल सुपारी अॅण्ड जनरल स्टोअर्स आणि न्यू बॉम्बे सुपारी किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स या भिवंडीतील दोन गोदामांवर खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, धर्मराज बांगर यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने १२ सप्टेंबर २०१८ रोजी कारवाई केली. या कारवाईत सात लाख ७० हजार ७१३ हजारांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून गोदामे सील केली.
याच मोहिमेंतर्गत अमली पदार्थविरोधी पथकाने वागळे इस्टेट भागातून सहा किलोचा ९५ हजारांचा गांजा जप्त केला.
पोलिसांकडून जनजागृती
तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस शाळा, महाविद्यालयांत जागृती करत आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे अधिकारी महाविद्यालयांमध्ये जाऊन समुपदेशन करत आहेत.