भिवंडीत साडेबारा लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
By नितीन पंडित | Published: January 31, 2024 04:47 PM2024-01-31T16:47:47+5:302024-01-31T16:48:00+5:30
मागील महिन्यात भिवंडीत गुटखा विक्री करणाऱ्या सुमारे ३० हून अधिक किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी चालकां विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता.
भिवंडी : शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्यांसह अवैध गुटखा पुरवठादार व विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची कंबर कसली आहे.मंगळवारी शहरात साडेबारा लाख रुपये किमतीचा गुटख्याचा अवैध साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. मागील महिन्यात भिवंडीत गुटखा विक्री करणाऱ्या सुमारे ३० हून अधिक किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी चालकां विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता.
शहरातील खंडू पाडा रस्त्यावरील बाबा हॉटेल परिसरात एका टेम्पो मधून गुटखा येणार असल्याची खबर मिळताच ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी मेघना पवार व माणिक जाधव यांनी या ठिकाणी सापळा रचून दुपारी संशयित टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये केसरयुक्त पानमसाला व व्हि १ सुगंधी तंबाखू असा १२ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्यानंतर टेम्पो चालक मोहम्मद अली अंसार खान यास ताब्यात घेऊन त्याच्या कडे केलेल्या चौकशीत सदरचा गुटखा विक्रेता लालाभाई उर्फ जावेद,राजकुमार सपाटे, गुलजार अहमद शेख यांचा असल्याचे निष्पन्न झाल्याने शांतीनगर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून टेम्पो चालक मोहम्मद अली अंसार खान यास अटक केली आहे.