‘ज्ञानसाधना’च्या विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून बनविली वेबसिरीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:47+5:302021-05-05T05:06:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोणतीही कला माणसाला स्वस्थ बसू देत नाही. लॉकडाऊनमध्ये एकांकिका बंद झाल्याने ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोणतीही कला माणसाला स्वस्थ बसू देत नाही. लॉकडाऊनमध्ये एकांकिका बंद झाल्याने ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी चक्क वेबसिरीज बनविण्याचा निर्णय घेतला. वर्गणी करून, तसेच वरिष्ठांची मदत घेत या मुलांनी ‘मुंतजीर’ ही आगळीवेगळी वेबसिरीज बनवून किमया घडविली. विशेष म्हणजे ती प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडल्याने त्यांच्या मेहनतीचे सोने झाले.
लॉकडाऊन काळात वेबसिरीज सर्वाधिक पाहिल्या जात आहेत. त्यामुळे आपणही वेबसिरीज बनवावी, असे या विद्यार्थ्यांच्या मनात आले; परंतु वेबसिरीज बनविणे हे या मुलांसाठी आव्हान होते. अंगी असलेली कला आणि स्वतःवरचा आत्मविश्वास यांचा मेळ साधत या विद्यार्थ्यांनी हे आव्हान पेलण्याचे ठरविले आणि वर्गणी करून त्यांनी या वेबसिरीजचा श्रीगणेशा केला. मुंतजीर या वेबसिरीजचे लिखाण अजय पाटील, मनीष साठे यांनी केले आहे.
लोकेशनसाठी आम्हाला दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी, तर पैशांची अडचण निर्माण झाली तेव्हा स्निग्धा सबनीस, ऋषिकेश म्हात्रे यांनी मदत केली. एडिटिंगसाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उमेश ढोबळे यांनी स्टुडिओ दिला. या वेबसिरीजचा अभिप्राय त्यांनी महाविद्यालयाच्याच वरिष्ठांकडून घेतला. ‘मुंतजीर’ प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस पडली असून, इंडियाच्या टॉप टीव्ही सिरीजमध्ये ही वेबसिरीज पहिल्या क्रमांकावर आहे, असे प्रॉडक्शनची बाजू सांभाळणाऱ्या चेतन पाटील याने सांगितले.
या वेबसिरीजचे छायाचित्रण सूरज घोरपडे, संकलन अजय आणि सूरज, मेकअप समता ब्राह्मी, साक्षी मणचेकर, तर प्रॉडक्शन टीम मंदार कामठे, कुशल मराठे, श्वेता रेमबुळकर, अदिती जामदारे, संजय गोसावी यांनी सांभाळली आहे. याआधी या विद्यार्थ्यांनी ‘मेमरीज ऑफ लव्ह’ ही वेबसिरीज गेल्या वर्षी बनविली होती. ती ‘यू ट्यूब’वर अपलोड केली होती.
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आणि फोर्थ वॉल, ठाणे या आमच्या संस्थेतून आम्ही गेली सहा वर्षे एकांकिका करतोय, असे चेतनने सांगितले.
चौकट
या वेबसिरीजमध्ये आम्ही एका कलाकाराची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. एका कलाकारासाठी त्याची कला किती महत्त्वाची असते, याची जाणीव आम्हाला होती, हीच जाणीव इतरांना करून देण्याचा प्रयत्न आम्ही ‘मुंतजीर’ या वेबसिरीजमधून केला आहे.
- चेतन पाटील
-------------