नाल्यात पडून जीम प्रशिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:27+5:302021-06-16T04:52:27+5:30
ठाणे: कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे बांधकाम सुरू असलेल्या १२ फूट खोल नाल्यात कोसळून प्रसाद देऊलकर ...
ठाणे: कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे बांधकाम सुरू असलेल्या १२ फूट खोल नाल्यात कोसळून प्रसाद देऊलकर (३५, रा. दिवा, ठाणे) या मोटारसायकलवरील जीम प्रशिक्षकाचा (इन्स्ट्रक्टर) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराविरुद्ध हलगर्जीपणा तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद हा आपल्या ठाण्यातील सावरकरनगर येथील मित्राकडे काही कामानिमित्त रात्री आला होता. तो मंगळवारी पहाटेच्या सुमारास संभाजी नगर, वागळे इस्टेट, क्रिटिकेअर हॉस्पिटल समोरील रस्त्याने जात होता. जवळच नाल्याच्या डायव्हर्शनचे बांधकाम सुरू आहे. नेमक्या या बांधकामाच्या ठिकाणी जिथे कोणताही आडोसा नव्हता, त्याच ठिकाणाहून प्रसाद मोटारसायकलवरून आत शिरला. यात तो १२ फूट खोल नाल्यात कोसळला. त्याची मोटारसायकल एका वाहिनीवर आदळली. पडल्यानंतर अर्ध्या तासाने काही स्थानिकांच्या लक्षात आले. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखलही केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक, अग्निशमन दलासह वागळे इस्टेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी या पथकांनी मदतकार्यही केले; मात्र प्रसादचा जीव वाचू शकला नाही. बांधकामाच्या ठिकाणी पुरेसे संरक्षक बॅरिकेडस् किंवा अन्य साधनसामुग्री उभी न करता हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कामाच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी दिली.