ठाण्यात ‘पेमेंट गेटवे’चे खाते हॅक; १६ हजार कोटींचे व्यवहार; २५ कोटींची फसवणूक; सरकारलाही गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 06:30 AM2023-10-09T06:30:14+5:302023-10-09T06:31:31+5:30
ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तींविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे : सायबर गुन्हेगारांच्या एका टोळक्याने पेमेंट गेटवे सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे बँक खाते हॅक करून वेगवेगळ्या बँक खात्यांमधून तब्बल १६ हजार १८० कोटींचे व्यवहार केले आहेत, तर २५ कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी ‘लोकमत’ला रविवारी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही फसवणूक बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. परंतु, ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. त्याच आधारे ठाणे सायबर विभागाने याप्रकरणी ६ ऑक्टाेबर २०२३ रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार एप्रिल २०२३ मध्ये कंपनीचे पेमेंट गेटवे खाते हॅक करून त्यातून २५ कोटी काढल्याचा आरोप आहे. याच तपासात १६ हजार १८० कोटींची उलाढाल झाल्याचेही उघड झाले आहे.
६ जणांवर गुन्हा दाखल
- ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तींविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
- याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील आरोपी जितेंद्र पांडे याने यापूर्वी आठ ते दहा वर्षे बँकांमध्ये रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर म्हणून काम केले आहे.
- या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून या टोळीने भारतातील अनेक कंपन्या आणि लोकांना लक्ष्य केल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एका अज्ञात व्यक्तीने सेफेक्स पे आउट कंपनी साॅफ्टवेअर हॅक करून २५ कोटी रुपयांचा अपहार केला. त्यामुळे कंपनीच्या तक्रारीवरून ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला हाेता. या गुन्ह्याचा तपास ठाण्याच्या सायबर सेलमार्फत करण्यात येत आहे. हा तपास सुरू असताना यातील फसवणुकीच्या २५ काेटींपैकी एक काेटी ३९ लाख १९ हजार २६४ इतकी रक्कम ही रियाल इंटरप्राइजेसच्या नावे असलेल्या एचडीएफसीच्या बॅंक खात्यात वळती झाल्याचे आढळले.
- डाॅ. पंजाब उगले, अतिरिक्त पाेलिस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर
रियल इंटरप्राइजेसच्या तपासात २६० बॅंक खाती आढळली. यात १६ हजार १८० काेटींचे व्यवहार झाले आहेत.
कोट्यवधींची रक्कम विदेशात वळती
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार यातील दोन आरोपींनी रियल इंटरप्राइजेस या कंपनीच्या वाशीच्या आयडीएफसी या बँक खात्यावरून काही आर्थिक व्यवहार केले आहेत.
फसवणुकीची रक्कम २५ कोटींची असल्याचे आढळले आहे. त्याप्रमाणे वाशीतील कार्यालयात पोलिसांनी तपासणी केली असता, काही संशयास्पद दस्तऐवज मिळाले आहेत. त्यात विविध कंपनी भागीदारी करार पत्रे, चेकबुक, डेबिट कार्ड आदी आढळले.
आरोपींनी नौपाडा भागातील कार्यालयात पाच नोटराईस भागीदारी संस्था तसेच अनेक बनावट संस्था स्थापन करून शासनाची फसवणूक केली. या संस्थांमार्फत काही रक्कम यूएसबीमध्ये कन्व्हर्ट करून विदेशात वळती केल्याचे आढळले आहे.