पासवर्ड हॅक करुन दोन खातेदारांना ९० हजारांना आॅनलाईन गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 08:43 PM2017-10-11T20:43:21+5:302017-10-11T20:43:39+5:30
वागळे इस्टेट भागातील दोन खातेदारांच्या बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून आॅनलाईनद्वारे सुमारे ९० हजारांना गंडा घालणा-यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे : वागळे इस्टेट भागातील दोन खातेदारांच्या बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून आॅनलाईनद्वारे सुमारे ९० हजारांना गंडा घालणा-यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
वागळे इस्टेटच्या लुईसवाडी भागात राहणा-या ६५ वर्षीय महिलेने आपल्या बँक खात्याचा पासवर्ड कोणालाही दिला नव्हता. तरीही ८ आॅक्टोबर रोजी दुपारी १.५५ ते १.५९ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या खात्यातून एका भामट्याने बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून त्यांच्या खात्यातून ५० हजार ९९७ रुपयांची खरेदी करून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी १० आॅक्टोबर रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक सीताराम वाघ हे अधिक तपास करीत आहेत.
अन्य एका घटनेत रहेजा गार्डन या इमारतीमधील रहिवाशी मोन्टू गज्जर (३८) यांच्या एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड क्रमांकाचा पासवर्ड इंटरनेटद्वारे एका भामट्याने हॅक केला. त्याच आधारे एटीएमद्वारे त्यांच्या खात्यातून चार वेळा प्रत्येकी दहा हजार रुपये असे ४० हजार रुपये काढण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनीही १० आॅक्टोंबर रोजी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.