डोंबिवलीतील भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला बेडसाठी करावी लागली नऊ तास प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:05 AM2020-07-06T00:05:48+5:302020-07-06T00:07:13+5:30
भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रामरथ यात्रेचे सारथ्य करणारे डोंबिवलीतील भाजपचे जुने कार्यकर्ते सलीम मखानी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कल्याण - भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रामरथ यात्रेचे सारथ्य करणारे डोंबिवलीतील भाजपचे जुने कार्यकर्ते सलीम मखानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचार मिळण्यात तब्बल नऊ तासांची दिरंगाई झाली. अखेर त्यांच्या मित्राने त्यांना भायखळा येथील रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मखानी हे डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडीत राहतात. ते ६४ वर्षांचे असून त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. शनिवारी सकाळी मखानी यांना श्वसनाचा त्रस जाणवू लागला. याबाबत माहिती मिळताच त्यांचे सहकारी प्रशांत परब यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. मखानी यांना शास्त्रीनगर कोविड रुग्णालयात उपचारांसाठी नेले. तेथे बेड नसल्याने त्यांना खुर्चीत बसवून ठेवून आॅक्सिजन सिलिंडर लावला. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बेड न मिळाल्याने मखानी यांच्या पत्नी व परब हे धास्तावले. अखेरीस त्यांनी बोरी समाजाच्या एका व्यक्तीला फोन केल्यानंतर त्यांच्याकडून कळवा, ठाणे, घाटकोपर आणि भायखळा हे चार पर्याय दिले. कार्डियाक रुग्णवाहिकेतून मखानी यांना भायखळा येथील प्रिन्स अली खान रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.