हिंदी भाषिक भवन उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:35 AM2017-07-30T02:35:19+5:302017-07-30T02:35:19+5:30
मराठी माणसाच्या हिताची भाषा करणाºया शिवसेनेने मीरा-भार्इंदरमधील मतदारांना आकर्षित करण्याकरिता मराठीबरोबर हिंदी भाषेत आपला वचननामा
ठाणे : मराठी माणसाच्या हिताची भाषा करणाºया शिवसेनेने मीरा-भार्इंदरमधील मतदारांना आकर्षित करण्याकरिता मराठीबरोबर हिंदी भाषेत आपला वचननामा तर प्रकाशित केलाच, पण आगरी-कोळी भवनाबरोबर हिंदी भाषिक भवनाची उभारणी करण्याचेही आश्वासन दिले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५ वर्षांपूर्वी मुंबईतील वाढता हिंदी भाषिक माणूस जोडण्याकरिता ‘मी मुंबईकर’ अभियान राबवले होते. १५ वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत वास्तव्य करणाºया हिंदी भाषिकांना सोबत घेण्याचा उद्धव यांचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे उधळला गेला. मात्र, मध्येमध्ये शिवसेना मनसेच्या धास्तीमुळे कडवी मराठीची भूमिका घेते. मात्र, मीरा-भार्इंदरकरिता शिवसेनेने मराठीमायबरोबर हिंदी मावशीलाही आपलेसे केले आहे.
मीरा-भार्इंदरसाठी मेट्रो, क्लस्टर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, बाळासाहेब ठाकरे कलादालन, आगरी-कोळी भवन व हिंदी भाषिक भवन, आदिवासी विद्यार्थी वसतिगृह, नवघर-कनकिया आणि घोडबंदर चौपाटी, घोडबंदर किल्ला परिसरात शिवसृष्टी, नाट्यगृह, आरमार केंद्र, रोरोसेवा, कचरा व्यवस्थापन, युवक कल्याण व शिक्षण अशा एक नाही तर अनेक योजनांचा शिवसेनेच्या वचननाम्यात समावेश आहे. आदिवासी, कोळी, मागासवर्गीय समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न शिवसेनेने या वचननाम्याच्या माध्यमातून केला आहे. शिवाय, सध्या सुरू असलेल्या तर काही पूर्णत्वास येत असलेल्या कामांचा उल्लेख शिवसेनेने आवर्जून केला आहे. परंतु, हा वचननामा मीरा-भार्इंदरमध्ये प्रसिद्ध न करता ठाण्यात प्रसिद्ध करण्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले. या वेळी हायलॅण्ड पार्क येथील शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या कार्यालयात ठाकरे यांच्या हस्ते या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
मीरा-भार्इंदरमधील धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर योजना मंजूर करून घेऊ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनाच्या कामाला सुरुवात होणार असून बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्यासाठी पालिकेने २५ कोटींची तरतूद केल्याचे नमूद केले. आरमार केंद्र आणि गं्रथालय, तरणतलाव व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदींचा उल्लेखही करण्यात आला आहे. परंतु, यातील अनेक कामे अंतिम टप्प्यात असून काही कामे मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत, तर काही कामे प्रस्तावित करण्यात आली असून अशा काही जुन्याच बाबींचा उल्लेख शिवसेनेने आपल्या वचननाम्यात केला आहे. सर्वप्रथम शिवसेनेचाच वचननामा प्रसिद्ध झाला.
ठळक वैशिष्ट्ये...
मूलभूत सोयीसुविधा
नागरी सुविधा - इको फ्रेण्डली स्मशानभूमी, गॅस व विद्युत शवदाहिनी, विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिक भवन, अग्निशमन दलासाठी अद्ययावत सामग्री, पासपोर्ट आॅफिस, रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, इको फ्रेण्डली टॉयलेट, मोफत वायफाय, दहीसर टोलनाक्यापासून मुक्तता, सुसज्ज अद्ययावत परिवहनसेवा, सीसीटीव्हींचे जाळे, पार्किंग झोन, फेरीवाल्यांसाठी मार्केट.
युवक कल्याण व शिक्षण
पायाभूत सुविधांनी सुसज्य शाळा, ग्रंथालये व लायब्ररी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा, व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन शिबिर, अभ्यास केंद्रे तसेच स्टडी सेंटर.
पर्यावरणाचा समतोल
दरवर्षी १ लाख वृक्षलागवड, विविध संकल्पनांवर आधारित थीम गार्डन्सचे निर्माण, बटरफ्लाय गार्डनची संकल्पना, खारफुटी संरक्षण व जतन, आॅक्सिजन पार्कची उभारणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प.
महिला व बालकल्याण
अक्षयकुमारच्या माध्यमातून सेल्फ डिफेन्स अॅकॅडमी, महिला बचत गटाची निर्मिती, महिला व मुलींसाठी नॅपकिन मशिन्स.
आरोग्याच्या सोयीसुविधा
कर्करोग निदान व रेडिएशन सेंटर, कार्डियाक रुग्णवाहिकांची संख्या वाढवणार, डायलेसीस सेंटर, हेल्थ क्लब, प्रभाग क्लिनिक तसेच छोट्या दवाखान्यांची निर्मिती. माझे मीरा-भार्इंदर, स्मार्ट मीरा-भार्इंदर पालिकेत ई-गव्हर्नन्स, पेपरलेस कारभार, आॅनलाइन परवाने, स्मार्ट अॅप, आॅनलाइन बांधकाम परवाने
क्रीडा व सांस्कृतिक
क्रीडासंकुलाची उभारणी, ओपन जिम, मोकळ्या परिसरात जॉगिंग ट्रॅकची बांधणी, जिम्नॅस्टिक सेंटर, एम्पी थिएटर, फुटबॉल व क्रिकेट प्रशिक्षण
कचरा व्यवस्थापन
अद्ययावत घंटागाड्या प्रकल्प सुरू करणार, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी, कचराकुंड्या, उत्तन डम्पिंगचे न्यायालयाच्या आदेशानुसार कचºयाचे व्यवस्थापन
परिवहन व रस्ते सुरक्षा
परिवहनच्या ताफ्यात नवीन बसेस, बसस्टॉप व नवीन बसस्थानक, एलिव्हेटेड उड्डाणपूल, सब वे, फुटओव्हर ब्रिज, रस्त्यांचे काँक्रिटीकरण आदींचा यात समावेश करण्यात आला आहे.
दहीसरचा टोल बंद करणार
ठाणे महापालिकेच्या हद्दीबाहेर असलेल्या मुलुंडजवळील टोल बंद करण्याचे आश्वासन यापूर्वी शिवसेनेने आपल्या वचननाम्यात दिले होते. परंतु, अद्यापही हा टोल काही बंद झालेला नाही. असे असताना आता निवडणुकीवर डोळा ठेवून पुन्हा दहीसर टोलनाक्यापासून मुक्तता देण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या वचननाम्यात दिले आहे.