ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:27 AM2021-09-02T05:27:04+5:302021-09-02T05:27:04+5:30
ठाणे : कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. ताण आणि औषधांचा मारा यामुळे केस गळती होत ...
ठाणे : कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. ताण आणि औषधांचा मारा यामुळे केस गळती होत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना केस गळतीची चिंता सतावत आहे. अनेकांना औषधोपचारादरम्यान, तर अनेकांना दोन ते तीन महिन्यानंतर ही समस्या सतावू लागली आहे. सर्वाधिक समस्या महिलांना जाणवत आहे. त्यात मानसिक ताणामुळे केस गळतीचे प्रमाण वाढत आहे. या समस्येसाठी डॉक्टरांकडे रुग्णांच्या रांगा लागल्या असल्याचे निरीक्षण आहे. जेवढे पॉझिटिव्ह रुग्ण होते, त्यापैकी बहुतांश रुग्णांना ही समस्या जाणवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
१) कोविडनंतर तीन महिन्यांनी गळू लागतात केस
कोविड झाल्यानंतर तीन महिन्यांनी केस गळण्यास सुरुवात होते. अनेक रुग्णांमध्ये हे प्रमाण वाढून डोक्याला टक्कल पडत जाते. कोरोनाकाळात घेत असलेल्या औषधांमुळे लिव्हरवर परिणाम होतो आणि त्यामुळे ही समस्या उद्भवते.
२) हे करा
लिव्हर प्रभावी करणारी, तसेच रक्तवाढीची औषधे घ्यावीत. योग्य आणि संतुलित आहार घ्यावा. ताण कमी करावा.
३) तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच करा घरगुती उपाय
डाळिंबचे भरपूर सेवन करावे. बीट, मोसंबी, संत्री, चिंच आणि आंबट फळे खावी, जेणेकरून लिव्हरची सूज निघून जाते. १० दिवस ब्रह्म मुहूर्त म्हणजेच पहाटे ३.३० ते ४.३० यावेळेत एरंडेलच्या पानांचा १० दिवस रस घेतल्यास ८० ते ९० टक्के तक्रार निघून जाते. ब्राह्मी, भृंगराज तेलाचाही वापर करावा.
४) शहरवासीयांना ॲसिडिटीचा त्रास असतोच. त्यामुळे त्याचा परिणाम लिव्हरवर होतो आणि लिव्हरला सूज येते. शरीरात फॅटी लिव्हर ग्रेड १ असतात. त्यामुळे या औषधांचा लिव्हरवर ताण येतो. कमीत कमी एक वर्ष मुळासकट केस गळतात. जवळपास ४० टक्के केस गळती होतेच. यात महिलांचे प्रमाण अधिक असून, योग्य आहार आणि घरगुती उपायामुळे ही समस्या दूर होऊ शकते.
- डॉ. अक्षता पंडित, आयुर्वेदतज्ज्ञ