महापौरांसह निम्म्या नगरसेवकांची महासभेला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:40 PM2019-11-19T22:40:11+5:302019-11-19T22:40:19+5:30
गणपूर्तीअभावी रद्द; ओमी समर्थक नगरसेवक भूमिगत? उल्हासनगरच्या महापौर निवडीवरून वेगवान घडामोडी
उल्हासनगर : उल्हासनगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या महासभेला महापौर-उपमहापौर यांच्यासह अर्ध्याअधिक नगरसेवकांनी दांडी मारली. सभेसाठी गणसंख्या पूर्ण होत नसल्याने अखेर महासभा रद्द करावी लागली. भाजपमधील ओमी कलानी समर्थक नगरसेवक भूमिगत झाल्याने ते न आल्याची चर्चा सुरू आहे.
उल्हासनगर महापालिका महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या महासभेला महापौर पंचम कलानी व उपमहापौर जीवन इदनानी यांच्यासह अर्ध्याअधिक नगरसेवकांनी दांडी मारली. कामकाज सुरू ठेवण्यासाठी नगरसेवकांच्या आग्रहाखातर भाजपचे वरिष्ठ नगरसेवक किशोर वनवारी हे पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसले; मात्र सभेची गणसंख्या अपुरी असल्याने पालिका सचिव प्रतिभा कुलकर्णी यांच्या निर्देशांनुसार महासभा रद्द करावी लागली.
महापौर पंचम कलानी यांची ही शेवटची महासभा होती. त्या समर्थक नगरसेवकांसह गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण आले. भाजपचा महापौर निवडून येण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी शहरात ठाण मांडले आहे. टाउन हॉलमध्ये भाजप व साई पक्ष नगरसेवकांची रात्री बैठक होणार आहे. भाजपमधील ओमी समर्थक नगरसेवक या बैठकीला हजर राहणार नाहीत, असे ओमी टीमचे कमलेश निकम यांनी सांगितले. तर रात्री भाजप गटनेता व महापौर पदाचे उमेदवार जमनुदास पुरस्वानी हे पक्षाच्या ३१ नगरसेवकांना व्हीप जारी करणार असल्याचे संकेत शहराध्यक्ष आणि आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले. भाजपचे सर्व नगरसेवक व्हीपचे आदेश पाळणार असून भाजपचा महापौर निवडून येणार असल्याचे आयलानी म्हणाले.
फुटीर नगरसेवकांची चाचपणी
महापौरपदाच्या निवडणुकीत साई आणि भाजपमधील ओमी टीम समर्थक नगरसेवक गळाला लागतात का? यासाठी शिवसेना शर्तीचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे घोडेबाजारला ऊत आल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शिवसेनेच्या लीलाबाई अशान याच महापौरपदी निवडून येणार असल्याचे बोलले जात आहे.