दीड वर्षाच्या बालकाच्या हाती दिली रिव्हॉल्व्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:52 AM2019-07-12T00:52:37+5:302019-07-12T00:53:07+5:30
दीड वर्षाचा मुलगा रडत असल्याने वडिलांनीच त्याच्या हातात चक्क खरीखुरी रिव्हॉल्व्हर देत त्याला काडतूस भरण्यास दिली.
टिटवाळा : दीड वर्षाचा मुलगा रडत असल्याने वडिलांनीच त्याच्या हातात चक्क खरीखुरी रिव्हॉल्व्हर देत त्याला काडतूस भरण्यास दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरुवातीला हा प्रकार टिटवाळ्यातील असल्याचा दावा केला जात होता. मात्र, शहरातील एका शाळेचे ट्रस्टी आदर्श उपाध्याय यांनी दिल्ली, नैनिताल येथे पर्यटनाला गेले असताना हा प्रकार केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले की, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबतची सत्यता पडताळणी आमच्याकडून चालू आहे. हा व्हिडीओ बनवणारे उपाध्याय यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी हा व्हिडीओ नैनिताल, दिल्ली येथे आपल्या कुटुंबासमवेत फिरायला गेले असताना बनवल्याचे सांगितले. दीड वर्षाचा मुलगा हा माझ्या हातातील रिव्हॉल्व्हर खेळणे समजून घेण्यासाठी रडत होता. म्हणून मी त्याला ते लॉक करून दिले आणि लगेच त्याच्या हातातून काढून घेतल्याचे त्यांनी सांगितल्याचे पांढरे म्हणाले.
सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर उपाध्याय यांनी, ही माझी चूक होती. त्याबद्दल मला पश्चात्ताप आहे, असे सांगितले आहे. झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागत असल्याचा व्हिडीओही त्यांनी पाठविला आहे. मात्र, त्यांनी जरी माफी मागितली असली तरी, केवळ मुलगा रडतो म्हणून दीड वर्षाच्या मुलाच्या हातात रिव्हॉल्व्हर देणे, हे किती महागात पडू शकते, याचा विचारच न केलेला बरा.