नाल्यावरील १० हजार बांधकामांवर हातोडा
By admin | Published: April 28, 2016 03:41 AM2016-04-28T03:41:00+5:302016-04-28T03:41:00+5:30
महापालिकेने आता नाल्यावरील सुमारे १० हजार बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : महासभेत नाल्यावरील बांधकामांच्या कारवाईचा मुद्दा चांगलाच रंगला असतांना आणि यावर नंतर बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या सुचना महापौरांनी दिल्या असतांनादेखील आता महापालिकेने आता नाल्यावरील सुमारे १० हजार बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नालेसफाई करतांनाच नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नाल्यावरील सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे नाल्यावरील बांधकामधारकांचे कोणत्याही प्रकारे पुनर्वसन केले जाणार नसल्याचेही आयुक्तांनी जाहीर केले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे प्रशासन आणि राजकरण्यांमध्ये मतभेद वाढण्याची शक्यता मात्र निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत भाजपाचे नगरसेवक मिलींद पाटणकर आणि काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी नाल्यावरील बांधकामावर कारवाई करण्याचा आग्रह धरला होता. परंतु, कारवाई केल्यास तेथील पुनर्वसनाची जबाबदारी पालिका घेणार नसल्याचे सुतोवाच पालिकेने केले होते. शिवाय इतर सदस्यांनीदेखील या कारवाईला विरोध केला होता. महापौर संजय मोरे यांनी याबाबत नंतर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.असे असतांनाही आता पालिकेने आक्रमक भूमिका घेऊन नाल्यावरील बांधकामांवर कारवाई करण्याचा फतवा काढला आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाच्या अनुषंगाने आयुक्तांनी बुधवारी सकाळी अतिक्रमण विभाग, घनकचरा विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आयोजित केलेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेतला. यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपनगर अभियंता दत्तात्रय मोहिते यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)