शहरातील १२४ धार्मिक स्थळांवर हातोडा
By admin | Published: October 11, 2016 02:59 AM2016-10-11T02:59:43+5:302016-10-11T02:59:43+5:30
अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील त्यांची वर्गवारी करुन जी
ठाणे : अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील त्यांची वर्गवारी करुन जी धार्मिक स्थळे कायद्याच्या चौकटीत बसून नियमित करता येऊ शकतात, अशी तब्बल ५२८ धार्मिक स्थळे आता नियमित करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. तर उर्वरित १२४ धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाणे आणि संबधींत स्थळांच्या मंडळांना नोटीसा देऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवाहन केल्याचे पालिकेने सांगितले.
सार्वजनिक जागेवरील धार्मिक स्थळे नियमाकुल करणे, निष्कासित करणे आणि स्थलांतरीत करणे याबाबतची बैठक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी महिन्यात पार पडली होती. या बैठकीमध्ये ज्या धार्मिक स्थळांबाबत आक्षेप प्राप्त झाले होते त्याची सुनावणीही आयुक्तांनी घेऊन संबधींत धार्मिक स्थळांची पुनर्पाहणी करण्याचे आदेश संबंधित प्रभाग समितीचे प्रभारी अतिरिक्त आयुक्तांना दिले होते. त्यानुसार संबधींत विभागाने या धार्मिक स्थळांची पुनर्पाहणी केली आहे.
त्यानुसार अ वर्गामध्ये ज्या एकूण ५८७ धार्मिक स्थळांचा समावेश आहे, त्याबाबत संबंधित परिमंडळाचे उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि शहर विकास विभागाचे अधिकारी यांनी ती डीसीआरप्रमाणे नियमाकुल होतील अथवा नाही याबाबत १ महिन्यात स्पष्ट अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या. (प्रतिनिधी)