मुंब्य्रात आणखी ४६५ बांधकामांवर हातोडा
By Admin | Published: May 8, 2016 02:57 AM2016-05-08T02:57:41+5:302016-05-08T02:57:41+5:30
गेल्या तीन दिवसांपासून मुंब्य्रामध्ये अनधिकृत बांधकामांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत शनिवारी ४६५ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांचाही
ठाणे : गेल्या तीन दिवसांपासून मुंब्य्रामध्ये अनधिकृत बांधकामांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत शनिवारी ४६५ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांचाही समावेश आहे. आता ढिगारे उपसून रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू झाले आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या मार्गदर्शनाखाली सात विशेष पथकांनी सकाळी कारवाई सुरू केली. त्यात मुंब्रा स्टेशन, बाजारपेठ, शंकर मंदिर, गुलाब मार्केट, तन्वरनगर, चाँदनगर, कौसा मार्केट, संजयनगर, अमृतनगर, दर्गा रोड, किस्मत कॉलनी, शादीमहल रोड येथील कारवाईत ४६५ मोठी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांचाही समावेश होता. मात्र त्यांनीही या कारवाईत फारसा अडथळा आणला नाही.
पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कारवाईची पाहणी करून ढिगारे उपसून रस्ते मोकळे करण्याचे आणि लगेचच तेथे डांबरीकरण करण्याचे आदेश नगर अभियंता रतन अवसरमोल यांना दिले. शनिवारची कारवाई पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, ओमप्रकाश दिवटे, मनीष जोशी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल, कार्यकारी अभियंता गोसावी, कोल्हे, सहायक आयुक्त मंगल शिंदे, दयानंद गोरे, मारुती गायकवाड, शंकर पाटोळे, मदन सोंडे, सागर घोलप यांनी विशेष पथकांद्वारे पार पाडली. या वेळी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तायडे उपस्थित होते.मुंब्रा येथील कारवाईला विरोध होईल असे वाटत असताना पथकाला फारसा त्रास झाला नाही. तरीही बंदोबस्त ठेवलेला होता. नेहमी विरोधाची भूमिका घेणारे नेतेच या काळात बेपत्ता झाल्याने ही कारवाई विनासायास पार पडल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कारवाई झालेल्या ठिकाणी बाधितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा फक्त चर्चेत आहे. (प्रतिनिधी)