रहिवाशाच्या मृत्यूनंतर इमारतीवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:44 AM2019-08-09T00:44:03+5:302019-08-09T00:44:07+5:30
अखेर सोडली घरे : हक्क कायम राहण्याकरिता दिले भोगवटा प्रमाणपत्र
डोंबिवली : पश्चिमेकडील महात्मा फुले रस्त्यावरील ४० वर्षे जुन्या अतिधोकादायक दोन मजली गोडसे इमारतीवर गुरुवारी महापालिकेने हातोडा घातला. बुधवारी दुसऱ्या मजल्यावरील घरामध्ये स्लॅब कोसळून विकास फडके या रहिवाशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेत इमारत तातडीने रिकामी करून सगळ्यांचे हक्क अबाधित राहण्यासाठी महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांना दिले.
जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांनी गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत गाळेधारक, भाडेकरू यांना भोगवटा प्रमाणपत्र देऊन जागा खाली करण्याचे आदेश दिले होते. दुपारी अडीचनंतर इमारत मोकळी केल्यानंतर तातडीने पाडण्यास सुरुवात करण्यात आली. पश्चिमेकडील महात्मा फुले रस्ता, गांधी रस्ता हे दोन्ही प्रचंड वर्दळीचे रस्ते या इमारतीलगत येतात. त्यामुळे त्या ठिकाणी पोकलेन, जेसीबी आणून कारवाई करण्यात अडथळे येत आहेत. कोणाचेही नुकसान होऊ नये, अपघात होऊ नये, या उद्देशाने गर्दीची वेळ टाळून कारवाई केली जाणार असल्याने पुढील काही दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. महापालिकेने वेळोवेळी रहिवाशांना इमारत अतिधोकादायक असल्याबाबत नोटिसा दिल्याची माहिती स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक यांनी दिली.
दरम्यान, बुधवारच्या दुर्घटनेत मरण पावलेले रहिवासी फडके यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्रीच त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले.
गाळेधारक अगोदर इमारतीमधून बाहेर पडायला तयार नव्हते. परंतु, इमारत जीर्ण झाली असल्याने १८ जणांना नोटिसा देत तातडीने जागा रिकामी करण्यास सांगितले. तसेच कागदपत्रांची पूर्तता करून भोगवटा प्रमाणपत्र दिले. त्यानंतर, सगळ्यांनी सामान काढून जागा रिकामी केल्यावर दुसरा मजला पाडण्याचे काम सुरू झाले आहे. - ज्ञानेश्वर कंखरे,
प्रभागक्षेत्र अधिकारी, ‘ह’ प्रभाग