अंबरनाथमध्ये अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:55 AM2018-01-16T00:55:19+5:302018-01-16T00:55:19+5:30
विम्को नाका ते गांवदेवी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने सोमवारी त्या रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात केली.
अंबरनाथ : विम्को नाका ते गांवदेवी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने सोमवारी त्या रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात केली. रुंदीकरणाआड येणाºया अनधिकृत दुकानांवर कारवाई करत पालिकेने हा रस्ता मोकळा केला. ज्या दुकानदारांनी उच्च न्यायालयात रूंदीकरणाविरोधात दाद मागितली आहे, ती तोडण्यात आलेली नाहीत. या रुंदीकरणात पालिकेने एकाच बाजूची बांधकामे अधिक तोडल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक विलास जोशी यांनी केला.
विम्को नाका ते गावदेवी दरम्यानचा रस्ता पालिकेने विकास आराखड्याप्रमाणे ४० फूट रुंद करण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या दुकानदारांची दुकाने आड येत होती, त्यांच्यावर पालिकेने हातोडा चालवला. दुकानदारांनी न्यायालयात दाद मागितल्यावर त्यांना थेट स्थगिती मिळू नये, यासाठी पालिकेने सर्व नोटिसांसंदर्भात उल्हासनगर आणि कल्याण न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यामुळे या दुकानदारांना आपले दुकाने वाचविणे शक्य झाले नाही. पण तीन ते चार दुकानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्याने ती दुकाने वगळता अन्य सर्व दुकानांवर जेसीबीने कारवाई झाली. या कारवाईला सुरुवात होताच स्थानिक नगरसेवक विलास जोशी यांनी आक्षेप नोंदविला. विकास आराखड्याप्रमाणे रस्ता करत असताना पालिकेच्या अधिकाºयांनी रस्त्याशेजारी असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाला या रस्त्याचा लाभ व्हावा आणि त्याच्या इमारतीसमोरची दुकाने तोडल्यास त्याचा थेट फायदा व्हावा, या हेतूने एका बाजूला जास्त मार्किंग करित बिल्डरचे हित जपण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात जोशी यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन त्याची कल्पनाही दिली होती. तसेच या संदर्भात योग्य कार्यवाहीचे आदेशही पालिकेला आले होते. मात्र त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप जोशी यांनी केला.
पालिकेने सकाळीच आपली सर्व यंत्रणा कामाला लावली होती. ५० ते ६० पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी कारवाईच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी होते. एवढेच नव्हे, पालिकेचेही सर्व अधिकारी कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होते. दुपारी कारवाई थांबविण्यात आली. ज्या दुकानांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांच्यासंदर्भात निकाल येताच त्या दुकानांवरही कारवाई करणार असल्याचे देविदास पवार यांनी स्पष्ट केले. रुंदीकरण झाल्यावर आता पालिका उलनचाळ येथील रस्त्याचे काम हाती घेणार असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले.