दिव्यात अतिक्रमणांवर पडणार हातोडा; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 11:54 PM2020-01-02T23:54:49+5:302020-01-02T23:55:11+5:30
५00 पेक्षा जास्त संसार येणार रस्त्यावर
- सुरेश लोखंडे
ठाणे : अतिवृष्टीमुळे अलिकडेच हाहाकार उडालेल्या दिव्यातील अतिक्रमणांवर सोमवारी कारवाईची कुºहाड कोसळणार आहे. सरकारी जागेवरील तब्बल १९ चाळी तोडण्याच्या धडक कारवाईचे नियोजन न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने केले आहे. या कारवाईमुळे ५०० हून अधिक घरांमधील हजारो रहिवाशांचा संसार रस्त्यावर येणार आहे. यादरम्यान, कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी या चाळींमधील हालचालींवर आधीपासूनच लक्ष केंद्रित केले आहे.
दिवा डम्पिंग ग्राउंडच्या उजव्या बाजूकडील दिवा खाडीकिनाऱ्याची खारफुटी नष्ट करून या अनधिकृत, बेकायदेशीर चाळी सरकारी जागेवर भूमाफियांनी बांधल्या आहेत. त्यामधील घरे अत्यल्प किमतीत मिळत असल्यामुळे बहुतांश गरजू रहिवाशांनी ती खरेदी केली आहेत. मात्र, यातील १९ ते २० चाळी सरकारी भूखंडांवर उभ्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
अनेक घरांत परकीय घुसखोर असण्याची शक्यता
रेल्वेच्या बोगीप्रमाणे या चाळींमधील घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील रहिवाशांपैकी १० ते २० टक्के रहिवासी भारतीय नसल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दाटीवाटीने असलेल्या या चाळींतील घरांमध्ये काय चालते, याची कल्पनाही करवत नसल्याची शंका प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. या चाळींमधून राष्ट्रविघातक कारवाया होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. यास वेळीच पायबंद घालण्याच्या दृष्टीने या चाळींचे अतिक्रमण नष्ट करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
भूमाफिया महिलांना पुढे करण्याची भीती
अतिक्रमणे तोडण्याची नव्या वर्षातील पहिलीच, तर गेल्या काही वर्षांमधील कदाचित ही सर्वात मोठी धडक कारवाई जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. एका चाळीत ३० ते ३५ घरे दाटीवाटीने बांधण्यात आली आहेत.
या घरांच्या १९ चाळींची नोंद घेऊन त्या तोडण्याची धडक कारवाई सोमवारी केली जाणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेकडून चार जेसीबी व कर्मचारी, मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. शंभरपेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचे नियोजन केले आहे.
50% महिला पोलिसांचादेखील या कारवाईत समावेश केलेला आहे. कारण, या कारवाईवेळी भूमाफिया महिलांना पुढे करून विरोध करण्याची शक्यता आहे. यावेळी होणारा कडवा विरोध हाणून पाडण्यासाठी जिल्हापातळीवर बैठका घेऊन चोख बंदोबस्तात या चाळींचे अतिक्रमण जमीनदोस्त केले जाणार आहे.
तोडण्यात येणाºया या चाळी 2010 नंतरच्या असल्यामुळे त्या कायदेशीररीत्या तोडल्या जात आहेत. त्या सरकारी भूखंडावर भूमाफियांनी बांधल्या आहेत. धडक कारवाई करून तोडण्यात येणाºया या चाळींखालील दीड ते दोन एकरचा भूखंड मोकळा केला जाणार आहे.
दिवा खाडीतील खारफुटी व कांदळवन नष्ट करून या चाळींचे अतिक्रमण भूमाफियांनी केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे या चाळी पाण्याखाली गेल्या होत्या. त्यातील रहिवाशांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली होती.