पुलाखालील अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:53 AM2019-12-22T00:53:32+5:302019-12-22T00:53:55+5:30
भिवंडी पालिका। शहर स्वच्छ ठेवण्याचे महापौरांचे नागरिकांना आवाहन
भिवंडी : भिवंडीच्या महापौर म्हणून प्रतिभा पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहर स्वच्छ व सुंदर कसे दिसेल, यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका व राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर या मुख्य रस्त्यावरील तसेच सर्व उड्डाणपुलाखालील अतिक्र मणे हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका, मेट्रो हॉटेलपर्यंत तसेच राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर कल्याण रोड या दोन्ही मुख्य रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी करू नये. वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
शहरात येणारे व शहराच्या बाहेर जाणारे हे दोन्ही मुख्य रस्ते स्वच्छ व चांगले राहतील, उड्डाणपुलाखालील भिंतीवर कोणत्याही प्रकारे बेकायदा जाहिराती, फलक अथवा कोणत्याही प्रकारे जाहिरातीचे स्टिकर्स लावून शहर विद्रुपीकरण करण्यात येऊ नये. आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. तसेच शहरातील कोणत्याही उड्डाणपुलाखाली जागेच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा वापर करू नये, असे उच्च न्यायालय तसेच राज्य सरकारचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, पालिका क्षेत्रातील सर्व उड्डाणपुलांखाली कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही उड्डाणपुलाखाली वाहनांचे पार्किंग किंवा रस्त्यावर अतिक्र मण करू नये. यामध्ये हातगाड्या, टू-व्हीलर ,चारचाकी वाहने, रिक्षा अथवा अन्य कोणत्याही प्रकारची मोठी वाहने उभी करू नयेत. जर कोणत्याही व्यक्तीने, संस्थेने या नियमांचे उल्लंघन करून उड्डाणपुलाखाली वाहने उभी केल्यास किंवा अतिक्रमण केल्यास ते तत्काळ जप्त करून त्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर पाटील यांनी दिला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात शहराला पुरस्कार मिळाल्याची करून दिली आठवण
शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये पुरस्कार मिळाला आहे. याची आठवण ठेवून सर्व नागरिकांनी शहर स्वच्छ, सुंदर, अतिक्र मणमुक्त राहील, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तरी, याकामी महापालिका व पोलीस प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.