मीरा-भाईंदर पालिकेचा बेकायदेशीर लॉजवर पडला हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:01 AM2020-10-16T01:01:47+5:302020-10-16T01:01:58+5:30
कागदपत्रे सादर करा :
मीरा राेड : मीरा-भाईंदर महापालिकेने बेकायदा लॉजवर कारवाई सुरू केली आहे. मीरा रोडच्या हटकेश भागातील गोल्डन पॅलेस या लॉजवर हातोडा चालवला. पालिकेने शहरातील १०५ लॉज आणि ३० ऑर्केस्ट्रा बार यांना पत्र पाठवून बांधकाम परवानगी दिलेली कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. आयुक्तांनी कारवाईसाठी प्रभागानुसार समिती तयार केली आहे.
काशिमीरा परिसराच्या प्रभाग समिती-६ मध्ये ४५ लॉज आणि ३० ऑर्केस्ट्रा बार आहेत. उत्तन परिसरातील प्रभाग समिती-१ मध्ये १९ लॉज, मीरा रोड प्रभाग समिती-५ मध्ये आठ लॉज व एक ऑर्केस्ट्रा बार, भाईंदर पूर्वेच्या प्रभाग समिती-३ मध्ये सात लॉज व सहा ऑर्केस्ट्रा बार, तर गोल्डन नेस्ट ते घोडबंदरच्या प्रभाग समिती-६ मध्ये २६ लॉज व दोन ऑर्केस्ट्रा बार असल्याची यादी तयार केली आहे.
आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी कारवाईसाठी प्रभाग अधिकारी, कनिष्ठ अभियंते, सर्वेअर यांची समिती तयार केली आहे. समितीने बांधकाम परवानगीबाबतच्या कागदपत्रांची पडताळणी करायची तसेच जागेवर जाऊन पाहणी करायची आहे. त्यानंतर अहवाल सादर करायचा आहे. दरम्यान, पालिकेने हाटकेश भागातील गोल्डन पॅलेस या तीन मजली लॉजचे बांधकाम बेकायदा असून गेल्यावर्षी थोडीफार कारवाई केली होती. परंतु, लॉकडाऊनकाळात पुन्हा लॉजचे बेकायदा बांधकाम पूर्ण करण्यात आले.
उपायुक्त अजित मुठे कारवाईच्यावेळी उपस्थित होते. प्रभारी प्रभाग अधिकारी हंसराज मेश्राम यांनी लॉजवर कारवाईला सुरुवात केली. दुसऱ्या मजल्यावरील १२ बेकायदा खोल्या पालिकेने तोडल्या. तर, पहिल्या मजल्यावरील कारवाईला सुरुवात केली असता खोल्यांमध्ये ग्राहक असल्याने कारवाई थांबवण्यात आली. अंतर्गत बेकायदा बांधकाम केल्याने कारवाई केली. लॉजचालकाने न्यायालयातून स्थगिती आदेश आणण्याचा प्रयत्न केला असता तो निष्फळ ठरला. चालक, मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या आधीही पालिकेने अशाच प्रकारची कारवाई करुनही पुन्हा बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत.
उल्हासनगरमध्ये १८ दुकानांवर कारवाई
- कॅम्प नं-५ येथील मासे व मटण मार्केटमधील १८ दुकानांवर कारवाई केली. कारवाईदरम्यान एका दुकानदाराने स्वत:च्या गळ्यावर सुरा ठेवल्याने काहीकाळ खळबळ उडाली.
- मार्केटमधील बहुतांश दुकाने रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. बुधवारी दुपारी १ च्या दरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलीस संरक्षणात रस्त्यावर आलेल्या दुकानांवर कारवाई सुरू केली.
- अचानक झालेल्या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू होती. कारवाईदरम्यान दुकानदार व शिंपी यांच्यात वाद झाला. त्यावेळी एका दुकानदाराने स्वत:च्या गळ्यावर सुरा ठेवून कारवाई थांबवा, अशी विनंती केल्याने वातावरण तणावग्रस्त झाले. अखेर, माजी नगरसेवक दर्शनसिंग खेमानी यांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले.
- मार्केटमधील दुकानांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने दुकानांवर कारवाई केल्याची प्रतिक्रिया शिंपी यांनी दिली. तर, दुकानांना नोटीस न देता धडक कारवाई केल्याचा आरोप माजी नगरसेवक खेमानी यांनी केला. कारवाईमुळे रस्ता मोकळा झाला असून कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.