डम्पिंग ग्राउंडजवळील बेकायदा बांधकामांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:39 AM2021-03-19T04:39:28+5:302021-03-19T04:39:28+5:30
उल्हासनगर : राणा खदान डम्पिंग ग्राउंडच्या पायथ्याशी केलेल्या बेकायदा बांधकामावरून महापालिकेवर टीकेची झोड उठल्यावर बुधवारी सहायक आयुक्त अनिल खतुरानी ...
उल्हासनगर : राणा खदान डम्पिंग ग्राउंडच्या पायथ्याशी केलेल्या बेकायदा बांधकामावरून महापालिकेवर टीकेची झोड उठल्यावर बुधवारी सहायक आयुक्त अनिल खतुरानी यांच्या पथकाने कारवाई केली. राजकीय वरदहस्तामुळे कारवाई होत नसल्याचे बोलले जात होते.
उल्हास नगरात गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली असून, महापालिकेने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. राणा डम्पिंगच्या पायथ्याशी असलेला कचरा जेसीबीच्या मदतीने बाजूला करून बेकायदा चाळीचे बांधकाम राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने भूमाफियाने सुरू केले होते. उन्हाळ्यात आगीने तर पावसाळ्यात कचऱ्याचा ढीग या बांधकामावर कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त करून कारवाईची मागणी केली; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक महेश सुखरामनी आदींच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांची भेट घेऊन शहरातील बेकायदा बांधकामासह अन्य समस्यांबाबत निवेदन दिले.
अखेर आयुक्तांच्या आदेशानुसार, खतुरानी यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात कारवाई केली. गेल्या महिन्यात डम्पिंग शेजारील एका मोठ्या बेकायदा बांधकामावर कारवाई केली; मात्र राजकीय दबावामुळे हे बांधकाम पुन्हा उभे राहिले. महापालिकेची धडक पाडकाम कारवाई ठप्प पडल्याने, शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप होत आहे.
चौकट
अन्य बांधकामांवर कारवाई कधी?
महापालिकेच्या नाकावर टिच्चून उभे राहत असलेल्या बेकायदा बांधकामांवर पाडकाम कारवाई कधी? असा प्रश्न या कारवाईनंतर विचारला जात आहे. उल्हासनगर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आरसीसीची अनेक बांधकामे उभी राहत आहेत. त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.