कल्याणच्या पत्रीपुलाचे बांधकाम लष्कराकडे हस्तांतरित करा; आमदार नरेंद्र पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 07:18 PM2019-08-13T19:18:59+5:302019-08-13T19:19:10+5:30
कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अंदाजे १०० वर्षापूर्वीचा पत्रीपूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अंदाजे १०० वर्षापूर्वीचा पत्रीपूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र गेली अनेक महिने कामामध्ये प्रगती जाणवत नाही. वाहतूक वाढल्याने नवीन समांतर पुलावर वाहतूक कोंडी होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. प्रशासन गतीने काम करत नसल्याने कल्याणकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत असल्याने आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पत्रीपूलाचे बांधकाम तातडीने लष्कराकडे हस्तांतरीत करण्याची मागणी केली.
आंबिवली रेल्वे स्थानकावरचा पूल लष्कराने विक्रमी वेळात उभारल्याचे उदाहरण समोर असल्याने पत्रिपुलाचे बांधकामही लष्कराकडे सोपविण्यासंदर्भात आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नुकताच पत्रिपुलावर एका व्यक्तीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजनही काही महिन्यांपूर्वी झाले आहे, मात्र कामात गती येत नसल्याने आमदार पवार यांनी ही मागणी केली आहे. या पूलावरुन नवी मुंबई, पनवेल, अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली तसेच लांब पल्ल्याच्या वाहनांची रहदारी असते. मात्र जुना पूल तोडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे याचा फटका केवळ कल्याण – डोंबिवली नागरिकांनाच बसत नाही तर रुग्णवाहिकांनाही सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात पत्रिपुलाचे बांधकाम लष्कराकडे सोपविण्यासाठी तातडीने संबंधित विभागासा आदेश देऊन नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशीही मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.