दंड आकारणीत ठामपाच्या मार्शलकडूनच हात की सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:45 AM2021-08-14T04:45:28+5:302021-08-14T04:45:28+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या मार्शलकडून सध्या विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. परंतु, ती केल्यानंतर अनेक नागरिकांना ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या मार्शलकडून सध्या विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. परंतु, ती केल्यानंतर अनेक नागरिकांना दंडाच्या पावत्याच दिल्या जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे महापौर नरेश म्हस्के यांनी या सर्व प्रकारची शहानिशा केली असून, अशा मार्शलवर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने मार्शलची नियुक्ती केली आहे. शहरातील महत्वाच्या नाक्यावर ते उभे राहत असून, विनामास्क एखादी व्यक्ती दिसली की त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूल करीत आहेत. दंड वसूल करण्यावरून अनेक वेळा नागरिक आणि िमार्शलमध्ये वादाचे खटकेदेखील उडत आहेत. परंतु, काही ठिकाणी दंडाची रक्कम वसूल करून पावती मात्र या नागरिकांना दिली जात नसल्याचे प्रकार समोर आले आहे. विशेष करून तीनहातनाका परिसरात असे प्रकार सर्रासपणे घडत असून, याची दाखल आता स्वत: महापौर नरेश म्हस्के यांनी घेतली आहे.
यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना पत्न देऊन दोषी सफाई मार्शलवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. अनेकांनी दूरध्वनी करूनही तक्रारी केल्या असल्याचे महापौरांनी सांगितले. असे प्रकार घडत आहेत याची शहानिशा करूनच कारवाईचे पत्न दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. असे गैरप्रकार करणाऱ्या मार्शलला यापूर्वीदेखील प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्न, तरीही मार्शलकडून असे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे.