गणेश मंदिरावर पालिगणेश मंदिरावर पालिकेचा हातोडाकेचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:34 AM2017-08-11T05:34:06+5:302017-08-11T05:34:06+5:30
वाहतुकीला अडथळा ठरत असलेले पश्चिमेतील रेल्वेस्थानकासमोरील पदपथावरील ३६ वर्षांचे जुने गणपती मंदिर गुरुवारी केडीएमसीने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. रस्त्याच्या एका आडोशाला असलेल्या या मंदिरावर कारवाई झाल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
डोंबिवली : वाहतुकीला अडथळा ठरत असलेले पश्चिमेतील रेल्वेस्थानकासमोरील पदपथावरील ३६ वर्षांचे जुने गणपती मंदिर गुरुवारी केडीएमसीने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. रस्त्याच्या एका आडोशाला असलेल्या या मंदिरावर कारवाई झाल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
उच्च न्यायालयाने रस्त्यात अडथळा ठरणारी तसेच पदपथांवरील बेकायदा प्रार्थनास्थळे हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, सप्टेंबरअखेरपर्यंत केडीएमसीला आपल्या हद्दीतील अशा प्रार्थनास्थळांवर कारवाई करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे.
केडीएमसीच्या हद्दीत बेकायदा ४४ प्रार्थनास्थळे आहेत. यापैकी ११ प्रार्थनास्थळांवर यापूर्वीच कारवाई केली आहे. रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारितील १२, वनविभाग आणि एमएमआरडीएच्या अखत्यारितील प्रत्येकी तीन अशी प्रार्थनास्थळे आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिका संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार करणार आहे. केडीएमसीत सोमवारी झालेल्या साप्ताहिक आढावा बैठकीत आयुक्त पी. वेलरासू यांनीही ही कारवाई जोमाने करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाºयांना दिले होते. या कारवाईच्या वेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरवण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे केडीएमसीची ही कारवाई दररोज चालणार आहे.
डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभागात गुरुवारी झालेल्या कारवाईच्या वेळी केडीएमसीचे प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे, अन्य प्रभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही तैनात होते. त्यामुळे कारवाईच्या वेळी विरोध झाला नाही.
३६ वर्षांपासूनचे हे गणपती मंदिर रेल्वेस्थानक परिसरातून येजा करणाºया नागरिकांसाठी श्रद्धास्थान बनले होते. त्यामुळे कारवाईदरम्यान भाविकांनी हळहळ व्यक्त केली. हे मंदिर रस्त्यात नव्हते. ते एका बाजूला होते. ते रहदारीलाही अडथळा ठरत नव्हते, तर मग कारवाई कशाला केली, असा सवाल त्यांनी केला.
रिक्षा स्टॅण्डला अभय का?
बुद्धिविनायक म्हणून संबोधल्या जाणाºया या गणपतीची स्थापना लक्ष्मण पाटील यांनी केली होती. कालांतराने तेथे मंदिर बांधण्यात आले.
गजानन सेवा मंडळ तेथे सेवा करत होते. मंदिराच्या बाजूला असलेल्या रिक्षा स्टॅण्डतर्फे गणेशोत्सवात तेथे गणपतीही बसवला जातो. मात्र, या मंदिरावर झालेल्या कारवाईबाबत गजानन सेवा मंडळाचे पदाधिकारी व भाविकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.
मंदिर वाहतुकीला अडथळा ठरत नव्हते. मात्र, रस्ता अडवून बसलेल्या रिक्षा स्टॅण्डला अभय का, असा प्रश्न भाविकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
पदपथावर हे मंदिर होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचे प्रभाग अधिकारी वानखेडे यांनी सांगितले.