मोबाइल सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:07+5:302021-07-08T04:27:07+5:30
* ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एकमधील नौपाडा आणि मुंब्रा भागात मोबाइल चोरी आणि जबरी चोरीचे प्रमाण अधिक आहे. ...
* ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एकमधील नौपाडा आणि मुंब्रा भागात मोबाइल चोरी आणि जबरी चोरीचे प्रमाण अधिक आहे. नौपाडयातील तीनहातनाका भागात रिक्षातून जाणाऱ्या तरुणीचा मोबाइल चोरट्यांनी हिसकावला. यातच तिचा मृत्यू झाला.
* त्यापाठोपाठ कल्याण परिमंडळातील डोंबिवली अर्थात विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हे प्रमाण लक्षणीय आहे.
* उल्हासनगर परिमंडळात अंबरनाथमध्येही मोबाइल चोरी अधिक आहे.
* तर वागळे इस्टेट परिमंडळात कापूरबावडी भागातही मोबाइल चोरट्यांचा उपद्रव अधिक आहे.
* मोबाइल चोरीस जाताच तातडीने हे करा...
मोबाइल चोरीस गेल्यानंतर तातडीने सीम कार्ड ब्लॉक करणे गरजेचे आहे. तसे झाले नाही, तर मोबाइल चोरणाऱ्याकडून त्याद्वारे खंडणी उकळणे, अश्लील मेसेज पाठविणे असे प्रकार घडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे मोबाइल चोरीनंतर तक्रार करण्याआधी ही खबरदारी घेणेही गरजेचे असल्याचा सल्ला नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिला आहे.
* ५० टक्के मोबाइलचा तपास लागतच नाही
गेल्या दीड वर्षात ठाणे आयुक्तालयातून ४४२ मोबाइलची चोरी झाली आहे. यातील केवळ ६८ मोबाइलचा शोध लागला. हे प्रमाण २५ टक्के आहे. यथावकाश आणखी २५ टक्के मोबाइल परत मिळतील. म्हणजेच ५० टक्के मोबाईलचा तपास लागतच नाही, असे पोलीसही खासगीत मान्य करतात.
...............
* मोक्कासारखी कडक कारवाई करणार
सध्या महागडया मोबाइलवर सोशल मीडियाच्या साईट्स अनेकजण न्याहाळत असतात. अशावेळी त्यांची मोबाइलवरील पकड सैल होते. हीच संधी साधून मोबाइल हिसकावण्याचे प्रकार होतात. महिलांनी मोबाइल पर्समध्ये ठेवून ब्ल्यू टूथ किंवा एअरफोनचा वापर करता येईल. मोबाइल चोरीचे प्रकार रोखण्यासाठी त्या त्या भागात नाकाबंदी आणि पेट्रोलिंग वाढविले आहे. अशा चोरट्यांवर मोक्कासारखी कडक कारवाई करण्याचाही विचार सुरू आहे.
- संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर