‘त्या’ नराधमांना फाशी द्या!,कल्याणमध्ये काढला निषेध मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:02 AM2018-07-19T03:02:35+5:302018-07-19T03:02:47+5:30
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे घडलेल्या हत्याकांडप्रकरणी नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त समाजाच्या वतीने बुधवारी कल्याण तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
कल्याण : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे घडलेल्या हत्याकांडप्रकरणी नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त समाजाच्या वतीने बुधवारी कल्याण तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी जीवे मारल्याचे गुन्हे दाखल करून दगडाने ठेचून आणि लोखंडी सळईने मारणाऱ्या त्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी शिष्टमंडळाच्या वतीने नायब तहसीलदार विशाल इंदूलकर यांना निवेदन देण्यात आले.
नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, त्याचबरोबर गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांनाही फाशीची शिक्षा व्हावी. मृत पावलेल्या पाचही जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख आणि त्यांच्या मुलांना शासकीय सेवेत नोकरी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यामध्ये समाजातील गोंधळी, बहुरूपी, नाथपंथी डवरी गोसावी, वासुदेव, मरिआईवाले, नंदीबैलवाले आदी कलावंतांना सरकारी मानधन दरमहिना पाच हजार देण्यात यावे आणि एसटी जातीमध्ये समावेश करावा. समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे. मुलामुलींना नोकरीत प्राधान्य मिळावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचा समावेश होता.
कल्याण-मुरबाड रोडवरील शासकीय विश्रामगृह येथून काढण्यात आलेल्या मोर्चाचे आयोजन भटके विमुक्त जाती-जमाती सामाजिक संघटना (कल्याण) यांच्या वतीने करण्यात आले होते. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थिती लावली होती. छगन शिंदे, बाबुराव जगताप, सुंदर डांगे, गोरखनाथ गोसावी, गणेश शिंदे या समाज प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.