हँगिंग टेडी, कपल्स शोपीसला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:07 AM2020-02-14T01:07:50+5:302020-02-14T01:07:54+5:30
व्हॅलेंटाइन डेचे निमित्त : तरुणांची खरेदीसाठी उडाली झुंबड; उलाढालीमध्ये वाढ
डोंबिवली : व्हॅलेंटाइन डे निमित्त आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देण्यासाठी मंगळवारी शहरातील दुकानांमध्ये तरुणतरुणींची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. भेटवस्तू देण्यासाठी सर्व जण काहीतरी नावीन्य शोधत होते. हँगिंग टेडी असलेल्या टोपल्या आणि म्युझिकल कपल्स शोपीस खरेदी करण्यावर अनेकांचा भर होता, असे दुकानदारांनी सांगितले.
व्हॅलेंटाइन डे च्या आधी आठवडाभर चॉकलेट डे, रोझ डे, हग डे असे विविध दिवस साजरे केले जातात. परंतु, व्हॅलेंटाइन डे ला प्रेमवीरांकडून सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. वास्ताविक पाहता प्रेमा तुझा रंग कसा, असे जरी विचारले जात असले तरी प्रेमाचा रंग हा लाल, गुलाबी असाच असतो. या दोन रंगांना अधिक महत्त्व असते. त्याच आधारावर गिफ्ट बाजारात दिसून येत आहेत.
मात्र, दोन वर्षांपासून व्हॅलेंटाइन डे च्या गिफ्ट्सचा वेगळा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. पूर्वी शोपीस घेण्याकडे कल अधिक होता. हा ट्रेण्ड आता बदलत आहे. त्यांची जागा उपयोगी वस्तूंनी घेतली आहे. त्यामध्ये चेन, लेडिस पर्स, अत्तर, बे्रसलेट, कडे आणि रिंग आदींचा समावेश आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला त्या वस्तू उपयोगात आणता येतील, याचा विचार करून वस्तूंची खरेदी केली जात आहे. व्हॅलेंटाइन डे ला पूर्वी केवळ कॉलेज तरुणतरुणी मोठ्या प्रमाणावर भेटवस्तू खरेदी करत असत. पण, आता शाळकरी मुलांपासून वयोवृद्ध असे सर्वच वयोगटांतील व्यक्ती व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. त्यामुळे या व्यवसायातील उलाढाल दरवर्षी वाढत आहे. त्यामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ होत असल्याची माहिती विक्रेते राजेश मुणगेकर यांनी दिली.
ग्रीटिंगची मागणी घटली
विके्रते गोविंद कुमावत म्हणाले, व्हॅलेंटाइन डे च्या खरेदीला सहा दिवसांपासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी हृदयाचा आकार असलेल्या उशा, टेडी, की-चेन, नाइट लॅम्प, लव्ह आकाराचे कॉफी मग, आकर्षक चॉकलेट बुके, गोल्डन रोझ आणि रेड रोझ असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांत ग्रीटिंगची मागणी मात्र घटली आहे. आता भेटवस्तू दिल्या जातात. उपयोगात येतील अशाच वस्तूही खरेदी के ल्या जात आहेत. महाविद्यालयीन तरुणतरुणींपेक्षा विवाहित दाम्पत्यांमध्ये भेटवस्तू घेण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. व्हॅलेंटाइन डे जवळ आला असल्याने भेटवस्तू घेण्यासाठी दुकानात गर्दी होत आहे.