‘हॅप्पी न्यू इयर’चा गजर
By admin | Published: January 1, 2017 03:51 AM2017-01-01T03:51:32+5:302017-01-01T03:51:32+5:30
सरत्या वर्षातील हुरहूर लावणाऱ्या आठवणी, आभार, दिलासा दिल्याबद्दल ऋणनिर्देश अशा मेसेजनी दिवसभर परस्परांशी कनेक्ट राहणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी
ठाणे/कल्याण/डोंबिवली : सरत्या वर्षातील हुरहूर लावणाऱ्या आठवणी, आभार, दिलासा दिल्याबद्दल ऋणनिर्देश अशा मेसेजनी दिवसभर परस्परांशी कनेक्ट राहणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी आधीच्या वर्षाला आनंदात निरोप दिला... रात्री बाराच्या ठोक्याला नववर्ष उजाडताच शुभेच्छांचा अक्षरश: खच पडला आणि झिंग आणणाऱ्या जल्लोषात सेलिब्रेशन रात्रभर सुरू राहिले.
ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांत नववर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या, पिकनिक, खेळ असे विविध उपक्रम आखण्यात आले होते. हॉटेल, मॉल, प्रमुख रस्ते सजवण्यात आले होते. अनेक सोसायट्यांनीही नववर्षाच्या स्वागतासाठी गच्चीत, आवारात कार्यक्रम ठेवले होते. फार्म हाऊस, पिकनिक स्पॉट आधीच फुल्ल होते. समुद्रकिनारेही गर्दीने फुलले होते. त्यातच हॉटेल पहाटे पाचपर्यंत खुली असल्याने आनंदाला उधाण आले. त्यामुळे २०१६ चा ३१ डिसेंबरचा सूर्य अस्ताला जाताच शनिवारी संध्याकाळपासूनच सेलिब्रेशनला सुरूवात झाली. रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. चर्चमध्ये घंटानाद झाला. धावत असलेल्या लोकलच्या मोटरमननी हॉर्न दिले, रस्त्यातून धावणाऱ्या वाहनांनी कर्कश हॉर्न वाजवत नवे वर्ष आल्याचा दणदणाट केला. आधीपासून सुरू असलेल्या कार्यक्रमांना रात्री बारानंतर जोश चढला, तो रात्र सरेपर्यंत...
ठाण्यात तलावपाळी, राम मारूती रोड, डोंबिवलीत फडके रोड, कल्याणला शिवाजी चौक-आग्रा रोड, अंबरनाथ-बदलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूरच्या प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत तरूण-तरूणींचे जत्थे जल्लोष करत फिरत होते. परस्परांना शुभेच्छा देत होते. शहापूर-मुरबाडमधील फार्म हाऊसही रात्री उशिरापर्यंत गजबजले होते. रात्रभर चालणाऱ्या पार्ट्या, लायटिंगच्या तालावर नाच-गाण्याचा सर्वत्र धुमाकूळ सुरू होता. कुठे संगीताचे कार्यक्रम सुरू होते, तर कुठे डिजेचा ताल. न्यू इअरच्या पार्ट्या म्हणजे फक्त तरूणाईची मक्तेदारी असे. पण यंदा महिलांनी, ज्येष्ठांनीही आपल्या स्वतंत्र कार्यक्रमांचे प्लॅनिंग केले. त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिक नव्या वर्षाच्या स्वागतात दंग झाल्याचे दिसून आले.
या सेलिब्रेशनमध्ये सर्वाधिक गर्दी होती ती फूड पॉइंट आणि हॉटेलवर. चाट, चायनीज, पिझ्जा कॉर्नर, सँडवीच, वेगवेगळे नॉनव्हेज पदार्थ, सोडा पब, आइस्क्रीम पार्लर गर्दीने ओसंडून गेले होते. इतके की पिझ्झा डिलिव्हरीला नेहमीच्या दुप्पट वेळ लागत होता. काही हॉटेलांनी तर संध्याकाळनंतर होम डिलिव्हरी उपलब्ध नसल्याचे जाहीर केले. आधी टेबल बूक केलेल्यांनाही वेटिंगचा सामना करावा लागला. (प्रतिनिधी)