सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत असल्याचा आनंद; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
By अजित मांडके | Published: March 4, 2023 06:06 PM2023-03-04T18:06:22+5:302023-03-04T18:07:10+5:30
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असा सामना गेल्या काही दिवसंपासून रंगला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि रस्ते कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येत असताना कळव्यातील कार्यक्रमाला अनुपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत 'मला या गोष्टीचा आनंद आहे की, या सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत आहेत', असे म्हटले आहे.
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असा सामना गेल्या काही दिवसंपासून रंगला आहे. असे असतानाच कळव्यातील कार्यक्रमाला अनुपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. २०१७ साली मिलिंद पाटील हे विरोधी पक्षनेते असताना कळवा खाडीकिनारी सुशोभिकरण प्रकल्पाच्या संचालक मंडळात असल्याकारणाने कळव्यासाठी हा प्रकल्प मंजूर झाला होता. हे काम बऱ्याच दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते.
सगळ्या नगरसेवकांनी बैठक घेऊन याचे उदघाटन देखील करण्याचे ठरवले होते. पण, मिलिंद पाटील आजारी असल्याने उदघाटन करता आले नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे की, या सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत आहेत. फक्त जनतेच्या माहितीसाठी की कळव्यातील कामे कशी व्यवस्थित होत आहेत आणि त्याचाच आम्हांला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांद्वारे व्यक्त केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"