पावसामुळे हापूस, काजूवर करपा रोगाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:42 PM2020-12-14T23:42:30+5:302020-12-14T23:43:47+5:30
वीटभट्टी चालकांमध्येही चिंतेचे वातावरण
ठाणे : मागील दोन ते तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात ढगाळ वातावरण होते. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने हजरी लावली. सोमवारी सकाळीही पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे गुरांच्या वैरणीसाठी खळ्यात साठवून ठेवलेला पेंढा भिजला असून हापूस आंबा आणि काजूच्या मोहरावर करपा रोगाचे संकट घोंगावू लागले आहे. याशिवाय वीटभट्टी चालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपूर्वीपासून झालेल्या बदलामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारी मध्यरात्री तसेच सोमवारीही पावसाने आपले बरसणे सुरू ठेवले. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. कृषी विभागाने पुढील दोन दिवस उत्तर कोकण विभागामध्ये ढगाळ हवामान आणि पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. यामुळे वातावरणातील आर्द्रतेमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने विविध पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे हापूस आंबा आणि काजूच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यावर नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे बुरशीनाशकाची फवारणी करणे उपयुक्त होईल. यासाठी थायोफिनेट मिथाईल एक ग्रॅम प्रति लीटर किंवा कार्बेन्डेंझिम एक ग्रॅम प्रति लीटर किंवा प्रोपीनेब
दोन ग्रॅम प्रति लीटर किंवा कार्बेन्डेंझिम १२ टक्के अधिक मॅन्कोझेब ६३ टक्के हे मिश्रण एक ग्रॅम प्रति लीटर पाणी यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची स्टिकर मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाल्यामध्ये केवडा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मॅन्कोझेब २.५ ग्राम प्रति लीटर प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी, असा सल्ला दिला आहे.
आरोग्याची काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन
आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. तसेच कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.
ढगाळ वातावरण, मध्येच पडणारा पाऊस यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. त्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करून नये, असेही खाजगी डॉक्टरांनी सांगितले.