येऊरमधील बेकायदा बारमुळे नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 02:03 AM2021-02-04T02:03:29+5:302021-02-04T02:03:35+5:30
येऊरचा निसर्गरम्य परिसर, घोडबंदरचा सर्व्हिस रोड आणि खाडीकिनारा तसेच कोठारी कम्पाउंड परिसरातील हॉटेल्स, हुक्कापार्लर आणि लाइव्ह ऑर्केस्ट्रा-बारच्या वाढत्या प्रमाणामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.
ठाणे : येऊरचा निसर्गरम्य परिसर, घोडबंदरचा सर्व्हिस रोड आणि खाडीकिनारा तसेच कोठारी कम्पाउंड परिसरातील हॉटेल्स, हुक्कापार्लर आणि लाइव्ह ऑर्केस्ट्रा-बारच्या वाढत्या प्रमाणामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. त्यावर उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेने संयुक्तरीत्या कारवाई करण्याची मागणी दहिसरच्या कांदरपाडा येथील दक्ष नागरिक संघटनेने केली आहे.
ही आस्थापने शासकीय जमिनींवर आहेत. त्यांना अग्निशमन दलाचे प्रमाणपत्रही मिळू शकत नाही. उत्पादन शुल्क विभागदेखील अशा ठिकाणी मद्यविक्री करू देत नाही, तरीदेखील सर्रासपणे बेकायदेशीरपणे मद्यविक्री केली जाते.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच इथे अशा प्रकारे त्याचेही उल्लंघन होत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. संरक्षित वनक्षेत्र असलेल्या येऊर परिसरात रात्री प्रवेशास सर्वोच्च न्यायालयाची बंदी आहे. तरीही हे नियम पायदळी तुडविले जात आहेत. घोडबंदर रोड परिसरातील शेतजमीन आणि वनविभागाच्या जागेवर दिवसाढवळ्या हे अतिक्रमण झाले आहे.
लाइव्ह ऑर्केस्ट्रा बार सुरू
याठिकाणी ठाणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नसताना घोडबंदरच्या सेवारस्त्यावर आणि खाडी किनाऱ्यालगतची सरकारी, खासगी आणि शेत जमिनीवर मनमानी पद्धतीने बांधकामे सुरू आहे. त्यातही लाइव्ह ऑर्केस्ट्रा या बारला अद्याप शासनाने परवानगी दिलेली नाही. तरीही ते सुरू आहेत. येऊर आणि उपवन भागात आठ तर कासारवडवली भागात ११ आणि कोठारी कम्पाउंडमध्ये पाच बार नियमांचे तसेच कोरोनावरील सामाजिक अंतराचे उल्लंघन करीत सुरू असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.