शिंदे गटाकडून भाजपचा छळ, आमदार गणपत गायकवाडांचा हल्लाबोल : म्हणे, बॅनर लावले की काढतात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:27 PM2023-09-14T12:27:07+5:302023-09-14T12:27:29+5:30
Ganpat Gaikwad: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात विकासकामे केली आणि फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर त्याची पोस्ट करताच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते ‘आमदाराचा केविलवाणा प्रयत्न’, ‘या कामात झालाय भ्रष्टाचार’, अशा पोस्टचा पाऊस पाडतात.
कल्याण - कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात विकासकामे केली आणि फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर त्याची पोस्ट करताच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते ‘आमदाराचा केविलवाणा प्रयत्न’, ‘या कामात झालाय भ्रष्टाचार’, अशा पोस्टचा पाऊस पाडतात. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली, धमक्या दिल्यावर कल्याण, डोंबिवलीत पोलिस ठाण्यांना फोन करून संरक्षणाची मागणी केली तर दिले जात नाही. एकाच सत्तेत भागीदार असतानाही शिंदे गटाने भाजपचा अक्षरश: छळ चालवला आहे, अशा शब्दांत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिली.
शिंदे गटाचे अनेक माजी नगरसवेक, विद्यमान पदाधिकारी पोलिस संरक्षणात खुलेआम फिरत आहेत. सणवाराला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी शुभेच्छांचे बॅनर लावले की लागलीच महापालिका, पोलिसांत शिंदे गटाकडून तक्रार करून ते काढून टाकायला भाग पाडले जाते. आ. गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मंगळवारी केला. मात्र, तपशील दिला नाही. बुधवारी त्यांनी काही पत्रकारांशी बोलताना शिंदे गटावर हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीची राज्यात सत्ता आहे. मात्र, कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये गेल्या दीड वर्षात जराही मनोमिलन झालेले नाही. या आरोपामुळे शिंदे गट शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यांना वरचे वर धमकाविले जाते. मी लावलेले शुभेच्छांचे बॅनर काढण्याची तक्रार केली जाते. केलेल्या कामांवर आक्षेप घेणारी पोस्ट टाकण्यात आली. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांचा वीट आलाय, असे ते म्हणाले.
शिंदे गटालाच मिळते सुरक्षा
पोलिसांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनुसार केल्या जातात. भाजप कार्यकर्त्यांना कुणी धमकी दिली, मारहाण केली तर मनुष्यबळ कमी असल्याचे कारण सांगून पोलिसांकडून सुरक्षा नाकारली जाते. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक फोन केला तर शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना पोलिस बंदोबस्त दिला गेला आहे, याकडे आ. गायकवाड यांनी लक्ष वेधले.
कल्याण पूर्व मतदारसंघातून आपण तीनवेळा आमदारपदी निवडून आलो. आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेने तीनवेळा निवडून दिले. मी केलेल्या विकासकामांचे फोटो भाजप कार्यकर्ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यावर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला समजू शकतो. पण, महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक हेच आमच्या कामांबद्दल आक्षेप घेणाऱ्या पोस्ट टाकतात.
भाजप आमदाराने कोणती विकासकामे केली, असा उर्मट सवाल करतात. भाजपच्या लोकप्रतिनिधींवर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप करतात. खूप दिवस हे सहन केल्यावर मी हरकत घेतली, असे गायकवाड म्हणाले.
शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी समोरासमोर येऊन नागरिकांसमोर चर्चा करण्याचे आव्हान दिले. आमदार म्हणून मी ते स्वीकारले. मात्र, त्याठिकाणी ते आले नाहीत. त्यामुळे ती चर्चा झाली नाही.