हरिनारायण आपटे, खांडेकर हे दोन डॉ. बाबासाहेबांचे आवडते लेखक- अर्जुन डांगळे
By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 15, 2024 04:00 PM2024-04-15T16:00:26+5:302024-04-15T16:01:25+5:30
अनघा प्रकाशनाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी "अनघोत्सव" हा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय येथे पार पडला.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम खूप होते हे सांगताना म्हणाले की, लोक राहण्यासाठी घर बांधतात. पण त्यांनी ग्रंथासाठी घर बांधले. त्यांची ग्रंथसंपदा खूप होती. हरिनारायण आपटे आणि खांडेकर हे दोन त्यांचे आवडते लेखक होते. मराठी साहित्याची आवड त्यांना होती असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी - लेखक - समाज विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले.
अनघा प्रकाशनाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी "अनघोत्सव" हा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय येथे पार पडला. ग्रंथालय संचालनालयाचे प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर म्हणाले की, पुस्तक प्रकाशन व्यवसाय हा वाचन संस्कृतीशी नाळ जोडणारा आहे. पुस्तक प्रकाशनात लेखक हा महत्त्वाचा घटक आहे. लेखकाने लिहीलेले प्रकाशित होणे महत्त्वाचे असते म्हणून प्रकाशक हा महत्त्वाचा असतो. युवक वाचक वर्ग वाढतोय पण वाचनाची माध्यमे बदलली आहेत. दर्जेदार पुस्तकांना वाचक आहे. त्यामुळे प्रकाशन व्यवसाय दिवसेंदिवस वाढतोय. पुस्तक, लेखक, प्रकाशक यांच्यातील महत्त्वाचा दुवा ग्रंथालय साधत आहे. वाचन संस्कृतीवाढीसाठी गंर्थालय संचलनालय हे सार्वजनिक ग्रंथालयाचा दुवा म्हणून काम करत आहे. यावेळी अनघा प्रकाशनचे संस्थापक मुरलीधर नाले उपस्थित होते.
दरम्यान, प्राक्कथन -डॉ.अनंत देशमुख, विषाक्त-चंद्रकांत भोंजाळ,पाच एकांकिका- डॉ.महेश केळुसकर, पुन्हा शुक्रवार उजाडण्यापूर्वी -श्रीकांत बोजेवार, गोष्ट टॉकीजची - दिलीप ठाकूर, द लॉस्ट बॅलन्स - रामदास खरे, फ्रेडा तोडा रंग केडा- मुकुंद वझे, देवाची स्वाक्षरी- ए.आर.नायर व जे.ए.थेरगावकर, पोतडी सुनील भातंब्रेकर तसेच कवितेची पालखी-राजेंद्र काजरोळकर या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यानंतर निवेदक राजेंद्र पाटणकर यांनी पुस्तकांच्या लेखकांशी संवाद साधला तर संचालक अमोल नाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.