महाराष्ट्र निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत हर्ष घाडगेला विजेतेपद
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 12, 2023 03:24 PM2023-12-12T15:24:08+5:302023-12-12T15:24:17+5:30
डावातील १५ व्या चालीत हत्तीच्या मोबदल्यात घोडा मिळवण्याची चाल वैभवला पराभवाच्या मार्गावर घेऊन गेली.
ठाणे : अहमदनगरच्या हर्ष घाडगेने साडे सात गुणांची कमाई करत रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, सीकेपी सोशल क्लब आणि सिकेपी ज्ञातीगृह आयोजित रोचेस महाराष्ट्र निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. साडे सात गुण मिळवूनही सरस कामगिरीत मागे पडलेल्या दृश्य शेट्टीला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. शेवटच्या नवव्या फेरीत पहिल्या पटावर हर्षने वैभव बोरसेला मात दिली.
डावातील १५ व्या चालीत हत्तीच्या मोबदल्यात घोडा मिळवण्याची चाल वैभवला पराभवाच्या मार्गावर घेऊन गेली. दुसरी पटावर स्पर्धेतील आकर्षण ठरलेल्या नागपूरच्या वेदिका पालला मुंबई उपनगरच्या दर्श शेट्टीने हरवले. या लढतीत वेदिकाने दर्शला चांगली झुंज दिली. दर्शने पाच प्यादी राखून वझीर मिळवल्यावर वेदिकाने पराभव मान्य केला. अन्य लढतीत मुंबई उपनगरच्या अर्णव खेर्डेकरने प्रथमेश गावडेला मात देत तिसरा क्रमांक संपादन केला. ठाण्याच्या आदित्य बारटक्केने पुण्याच्या अभिजित जोशीला बरोबरीत रोखत पहिल्या दहात जागा मिळवली.
स्पर्धेतील इतर विजेते : ७ वर्षाखालील मुले : आयुष जगताप (पुणे), लक्ष दिघे, शिखर नानावटी ( दोन्ही मुंबई उपनगर).
मुली : मिशका त्रिपाठी (ठाणे), गिरीशा पै (मुंबई उपनगर),भूमी धगडाधगे (नंदुरबार).
९ वर्षाखालील मुले : अर्जुन सिंग (मुंबई उपनगर), निर्वाण शाह (मुंबई शहर), मिथुन आर (रायगड).
मुली : भूमिका वाघेला ( छत्रपती संभाजी नगर), अनाहीका सिन्हा (ठाणे ), आश्वि अगरवाल (मुंबई उपनगर).
११ वर्षाखालील मुले : आर्यन वाघमारे (ठाणे), वेदांत गोगरी, हृदय मणियार ( दोन्ही मुंबई शहर ).
मुली : हिया पाटील ( ठाणे), हिरण्मयी कुलकर्णी, महूआ देशपांडे ( दोन्ही मुंबई उपनगर).