हर्षदचा मृतदेह सापडला ३६ तासांनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 03:11 AM2018-07-13T03:11:23+5:302018-07-13T03:11:33+5:30
पूर्वेतील नांदिवली नाल्यात मंगळवारी रात्री वाहून गेलेल्या हर्षद रमेश जिमकळ (२४) याचा मृतदेह ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर गुरुवारी सकाळी आयरे गावानजीक बचाव पथकाला मिळाला.
डोंबिवली : पूर्वेतील नांदिवली नाल्यात मंगळवारी रात्री वाहून गेलेल्या हर्षद रमेश जिमकळ (२४) याचा मृतदेह ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर गुरुवारी सकाळी आयरे गावानजीक बचाव पथकाला मिळाला. हर्षदचा शोध घेण्यासाठी नौसैनिक आले होते. मात्र, ते पाण्यात उतरण्यापूर्वीच केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या पथकाच्या हाती त्याचा मृतदेह लागला.
आयटीआयचे प्रशिक्षण घेणारा हर्षद मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास क्लासहून घरी परतत होता. त्यावेळी नांदिवली नाल्याजवळ लघुशंकेसाठी तो उभा राहिला होता. त्यावेळी तोल गेल्याने तो नाल्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी मानपाडा पोलीस आणि पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली.
१५० मिमी इतका पाऊस, २५ फुटी नाल्याच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह, कोपर खाडीपर्यंत जाणाऱ्या पाच किमी नाल्याचा मोठा विस्तार, दोन्ही किनाºयांना असलेली झाडी, भरपूर चिखल यांची पर्वा न करता केडीएमसीचे अग्निशमन दल, महसूल यंत्रणा, ठाणे आपत्ती निवारण दल, खाजगी स्वयंसेवी संस्थेने आपल्या पथकांच्या मदतीने हर्षदचा शोध घेण्यासाठी दिवसरात्र मोहीम राबवली. चार ते पाच वेळा या नाल्याचा कानाकोपरा तपासण्यात आला. अखेर, घटनास्थळापासून दोन किमी अंतरावर आयरे परिसरातील ज्योतीनगर येथे हर्षदचा मृतदेह गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास हाती लागला. पोलिसांनी विच्छेनानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. शिव मंदिर येथील स्मशानभूमीत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या संपूर्ण बचाव मोहिमेत स्वत: बारकाईने लक्ष घातले होते. निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे, तहसीलदार अमित सानप यांनी स्थानिक यंत्रणा, नौदल, पोलीस, ठाणे पालिकेचे आपत्ती दल यांच्यात योग्य तो समन्वय ठेवून ही मोहीम यशस्वी केली.
केडीएमसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड आणि सुधाकर कुलकर्णी, खाजगी स्वयंसेवी संस्थेचे गजानन काळण, ठाणे आपत्ती निवारण दलाचे झळके यांनी आपल्या पथकांच्या मदतीने ही मोहीम राबवली.
कुटुंबीयांना मानसिक धक्का
डोंबिवलीतील पूर्वेतील गांधी चौक परिसरातील मुक्ताई इमारतीत तिसºया मजल्यावर हर्षद आई, वडील आणि मोठ्या भावासह राहत होता. त्याच्या बहिणीचे लग्न झाले आहे. हर्षदच्या वडिलांची सहा महिन्यांपूर्वीच बायपास झाली आहे. हर्षदच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.