हवामानाने साथ दिल्यास सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:24+5:302021-03-04T05:16:24+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे पीक घेतले जात आहे. ही पिके घेत असताना हवामानाने साथ दिल्यास ...
भातसानगर : शहापूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे पीक घेतले जात आहे. ही पिके घेत असताना हवामानाने साथ दिल्यास मुद्दल तर निघाले आता केवळ नफा मिळविणे बाकी, असा सूर उमटू लागला आहे.
तालुक्यातील दहागाव येथील राजेश जाधव, गंगाराम जाधव, गुरुनाथ जाधव, सचिन पवार या शेतकऱ्यांनी नाले, ओहळ, पाझर तलाव, कालव्याच्या पाण्यावर सध्या भेंडी, काकडी, घोसाळी, मिरची, भोपळा, कारली यांचे उत्पादन घेतले आहे. गंगाराम जाधव यांनीही कालव्याच्या पाण्यावर आपल्या दीड एकर जागेत सितारा मिरचीचे भरघोस उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. तीन क्विंटल मिरची जवळच्याच बाजारात विक्रीसाठी जात असून, आपल्याला यातून एक ते दीड लाख रुपये नफा मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सद्य:स्थितीत झालेला खर्च या उत्पन्नातून मिळविला असून, केवळ आता नफाच बाकी असल्याचे ते म्हणाले.
भाजीपाल्याचे भरघोस उत्पादन घेतले जात असूनही यासाठी मात्र व्यापाऱ्यांकडून बाजारात त्याला हवा तितका भाव मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. येथे व्यापारी भेंडी २० ते २५ रुपये दराने घेतात तीच भेंडी विकताना ५० ते ६० रुपये किलोने विकली जाते.