नौपाड्यातील रहिवाशाला मारहाण करणाऱ्या हसमुख शहाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 05:35 AM2019-09-19T05:35:04+5:302019-09-19T05:35:08+5:30
राहुल पैठणकर यांना क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण करणारा विकासक हसमुख शहा याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केलीे.
ठाणे : राहुल पैठणकर यांना क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण करणारा विकासक हसमुख शहा याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केलीे. त्याने स्वत:हून नौपाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावल्यानंतर त्याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
विष्णुनगर येथील ‘सुयश’ सोसायटीत लिफ्टच्या वादातून ११ सप्टेंबर रोजी शहा -पिता पुत्रांनी पैठणकर यांना जबर मारहाण केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी शहाविरुद्ध १६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. तसेच मनसेचे ठाणे- पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी शहा याला जाहीर माफीही मागायला भाग पाडले. तर दोघांच्यातील वाद हा वैयक्तिक असल्याचे गुजराथी समाजाने एका पत्रकार परिषदेद्वारे मंगळवारी जाहीर केले. दरम्यन, ठाणे न्यायालयाने वैयक्तिक जामिनावर शहाची सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
>मालमत्ता मराठी व्यक्तींनाच विका
शहा प्रकरणानंतर अनेक ठाणेकरांनी मनसेच्या कार्यालयात येऊन काही तक्रारीही केल्या. काही परप्रांतीय हे जाणूनबुजून मराठी व्यक्तीला घर, दुकान, जमीन अशा मालमत्ता विक्री किंवा भाड्याने देत नाहीत. त्यासाठी ते आपल्या समाजाला प्राधान्य देतात. तसेच मराठी व्यक्तींनीही आपल्या मालमत्तांची विक्री करताना मराठी व्यक्तींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी बुधवारी केले. या वेळी ‘आपलं घर - मालमत्ता मराठी माणसालाच विका!’, ‘आपले ठाणे-मराठी ठाणे’ अशा आशयाच्या फलकांचेही मोरे यांनी विष्णुनगर येथील मनसेच्या मुख्यालयासमोर अनावरण केले.