हसनैनला करायचा होता सुपारीचा व्यापार
By admin | Published: March 3, 2016 04:41 AM2016-03-03T04:41:51+5:302016-03-03T04:41:51+5:30
हसनैन वरेकर याला सुपारीच्या व्यवसायाकरिता सुमारे ३५ लाखांची गरज होती. त्यासाठी त्याने कोपरखैरणे येथील मेहुणे शौकत खान यांच्याकडून सात लाखांचे कर्ज घेतले होते.
ठाणे : हसनैन वरेकर याला सुपारीच्या व्यवसायाकरिता सुमारे ३५ लाखांची गरज होती. त्यासाठी त्याने कोपरखैरणे येथील मेहुणे शौकत खान यांच्याकडून सात लाखांचे कर्ज घेतले होते. खासगी पेढीत सोने गहाण ठेवून ८७ हजारांचे कर्जही घेतले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे नोकरी गमावलेल्या हसनैन याला व्यवसायाकरिता पैशांची जुळवाजुळव करता न आल्याने त्याने नैराश्येतून हे हत्याकांड केले असावे का, ही शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत.
हसनैन वरेकर याने आपण नोकरी करीत असल्याचे घरी सांगितले असले तरी, प्रत्यक्षात त्याची नोकरी गेली होती. त्याच्या डोक्यात सुपारीचा व्यवसाय करण्याचा विचार सुरू होता. त्याकरिता डिसेंबर २०१४ मध्ये त्याने शौकत यांच्याकडून सात लाखांचे कर्ज घेतले होते. हा व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळविणे, त्यानंतर मालाची आयात-निर्यात करणे, त्याचा साठा करणे, मालाची विक्री करणे, पैशांची वसुली करणे याकरिता त्याला तब्बल ३५ लाखांची गरज होती. त्यातील सात लाख ८७ हजारांची त्याने जमवाजमवही केली होती. घरातील दागिने गहाण ठेवले होते. मात्र, इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था होत नव्हती.
हसनैनने आणखी कोणाचे कर्ज घेतले होते का, वसुलीकरिता कुणी तगादा लावला होता का, कुटुंबात एखाद्या जुन्या मालमत्तेचा वाद उफाळून आला होता किंवा कसे, या आर्थिक बाजूंची चाचपणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली. आर्थिक बाजूंबरोबर सुबियाचा पुरवणी जबाब, काळ््या जादूसाठी त्याला कोणी
प्रेरित केले आहे का, याबाबतही
तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)