हस्तीदंताची तस्करी करणा-या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:42 AM2017-10-04T01:42:26+5:302017-10-04T01:42:44+5:30
पुण्याच्या ग्रामीण भागातील एका पारध्याकडून घेतलेले हस्तीदंत एक ते दीड कोटींमध्ये विक्री करण्यासाठी गि-हाईकाच्या शोधात असलेल्या निलेश ननावरे (२५) आणि अजिंक्य बागल (२५, रा. दोघेही मंचर, पुणे) यांना कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली.
ठाणे : पुण्याच्या ग्रामीण भागातील एका पारध्याकडून घेतलेले हस्तीदंत एक ते दीड कोटींमध्ये विक्री करण्यासाठी गि-हाईकाच्या शोधात असलेल्या निलेश ननावरे (२५) आणि अजिंक्य बागल (२५, रा. दोघेही मंचर, पुणे) यांना कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून दहा लाख रुपये किंमतीचे हस्तीदंत हस्तगत करण्यात आले आहे.
कासारवडवली परिसरात दोघेजण लाखो रुपये किंमतीचे हस्तीदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, सहायक आयुक्त महादेव भोर, वरिष्ठ निरीक्षक दत्ता ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, जमादार मधुकर कोठारे, हवालदार अंकुश पाटील, पोलीस नाईक महेंद्र लिंगाळे, प्रविण घोडके, संदीप सुरवसे आणि कॉन्स्टेबल दीपक बर्ले आदींच्या पथकाने २ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नीलेश आणि अजिंक्य यांना ज्ञानगंगा कॉलेजच्या शेजारी असलेल्या उन्नती ग्रीन सोसायटीच्या मेनगेटजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आंतरराष्टÑीय बाजारपेठेत अनुक्रमे सात लाख आणि तीन लाख रुपये किंमतीचे दोन हस्तीदंत हस्तगत केले. त्यातील एक सुमारे सव्वा किलोचा तर दुसरा सुमारे दीड किलो वजनाचे आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांनाही ठाणे न्यायालयाने ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
दोघेही पुणे जिल्हयातील मंचर येथे वास्तव्यास असून चार वर्षांपूर्वी त्यांनी पारध्याकडून हे हस्तीदंत ३५ हजारांमध्ये खरेदी केले होते. घरातल्याच एका माळ्यावर त्यांनी ते ठेवले होते. बाजारामध्ये एक ते दीड कोटींमध्ये ते विकले जाऊ शकतात, अशी त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या विक्रीसाठी गिºहाईकाच्या शोधात असतांनाच पोलिसांच्या हाती लागले.