सिंधी समाजाची सभ्यता व संस्कृतीचे प्रतिक हटडी; उल्हासनगरातील बनवितात हजारोच्या संख्येने हटडी
By सदानंद नाईक | Published: November 3, 2023 05:13 PM2023-11-03T17:13:51+5:302023-11-03T17:14:04+5:30
दिवाळीला सिंधी सभ्यता व संस्कृतीची ओळख असलेल्या हटडीची बांधणी शहरातील विविध भागात हजारोच्या संख्येत होते.
उल्हासनगर : दिवाळीला सिंधी सभ्यता व संस्कृतीची ओळख असलेल्या हटडीची बांधणी शहरातील विविध भागात हजारोच्या संख्येत होते. घरात जन्मलेला मुलाने आपल्या व्यापाऱ्यांचा वारसा पुढे चालवावा म्हणून दिवाळीला सिंधी समाज हटडीची पूजा करतात.
उल्हासनगर बहुसंख्येने सिंधी समाज राहत असून त्यांचा पिढीजात व्यवसाय व्यापार आहे. घरी जन्मलेल्या मुलाने व्यापाराचा वारसा पुढे चालावावा म्हणून पहिल्या दिवाळीला मुलाच्या नावाने हटडीची पूजा केली जाते. या सिंधी संस्कृतीला ५ हजार वर्षाचा इतिहास असून मोहनजोदडो शहराचे उत्खनन झाले. तेंव्हा हटडीचे अवशेष मिळाल्याचे बोलले जाते. हट म्हणजे दुकान असा हटडीचा अर्थ होतो. दिवाळीला हटडी मध्ये लक्ष्मी देवीसह अन्य देवाला विराजमान करून पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी विधिवत पूजा करून हटडी नदी काठी ठेवली जाते. लक्ष्मीदेवीसह अन्य देवतांची पूजा केल्यावर देवी मां व्यापारात भरभराटीचा आशीर्वाद देते. असे सिंधी समाजात मानले जाते.
सिंधी बांधवासाठी दिवाळीला हटडी वनाविण्याचे काम दिवाळीपूर्वी एक महिन्यापासून सुरू केले जात असल्याची माहिती कमल मूलचंदानी यां महिलेने दिली. कमल मूलचंदानी ह्या वृद्ध असून इतर समाजाच्या मदतीने हजारो हटडी कॅम्प नं-२ येथील टेलिफोन एक्सचेंज येथील रस्त्याच्या मोकळ्या जागी बनविते. एका हटडीची किंमत १०० ते २०० रुपयां दरम्यान असल्याची माहिती कमल मूलचंदानी यांनी दिली. मूलचंदानी यांच्या प्रमाणे अनेक सिंधी महिला व इतर समाज शहरातील विविध भागात हटडी बनवून विकतात. सिंधी समाजात हटडीला विशेष महत्त्व असून सिंधी समाजाच्या प्रत्येक घरात हटडीची पूजा केली जाते.