ठाकरे गटाकडून द्वेषाचे राजकारण, ललित पाटीलवर काय कारवाई केली: नीलम गोऱ्हेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 01:00 PM2023-10-22T13:00:43+5:302023-10-22T13:02:19+5:30
टेंभी नाका येथील देवीचे गोऱ्हे यांनी शनिवारी दर्शन घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : विजयादशमीच्या आझाद मैदानावरील सभेसाठी आमचे सगळे कार्यकर्ते तयारी करत आहेत. एका बाजूला सातत्याने द्वेषाचे राजकारण होत आहे. कोणाला तरी विरोध करायचा, समोरच्या माणसाला आयुष्यातून उठवायचे, असा संकल्प केला जातो. पण असा संकल्प करून देव यश देत नसतो, अशी टीका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर केली.
टेंभी नाका येथील देवीचे गोऱ्हे यांनी शनिवारी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेत्या मीना कांबळी, आमदार मनीषा कायंदे, माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव आदी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी २२ विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजना नुसत्या जाहीरच नाही केल्या तर शिवदूतांमार्फत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संयोजन सुरू केले आहे. संजय राऊत आरोप करतात की, आमचा पक्ष ड्रग्जच्या बाजूने आहे का? पण माझा त्यांना सवाल आहे की, तुमच्याच पक्षातील तो ललित पाटील उबाठातून कधी बाहेर पडला. त्याच्यावर कधी कारवाई केली. तो तुमच्याच पक्षात आहे. पण तुम्ही आम्हालाच उलटे प्रश्न करत आहात, असे त्यांनी सुनावले.