कल्याण महापालिकेने घातला धार्मिक स्थळावर हातोडा
By Admin | Published: April 9, 2017 02:27 AM2017-04-09T02:27:50+5:302017-04-09T02:27:50+5:30
पश्चिमेकडील काळी मशीद परिसरात असलेला व रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरणारा हजरत निगरानी शहा बाबा यांचा ३०० वर्षे जुना दर्गा हटवण्याची कारवाई शनिवारी
कल्याण : पश्चिमेकडील काळी मशीद परिसरात असलेला व रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरणारा हजरत निगरानी शहा बाबा यांचा ३०० वर्षे जुना दर्गा हटवण्याची कारवाई शनिवारी करण्यात आली. या वेळी जमावाने तीव्र विरोध करीत पोलिसांबरोबर झटापट केली. मात्र, पोलिसांनी विरोध मोडीत काढून महापालिकेस कारवाई करण्यास मदत केली.
शहरातील रस्ते विकासाच्या आड येणाऱ्या बेकायदा धार्मिक स्थळांवर महापालिकांनी ३१ मेपर्यंत कारवाई करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीत दिले आहेत. हे आदेश राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ४४ धार्मिक स्थळे ही रस्ते विकासाच्या आड येत असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. त्यापैकी ४ धार्मिक स्थळे हटवून त्यांचे यापूर्वी स्थलांतर केले आहे. उर्वरित कारवाई शनिवारी महापालिकेने हाती घेतली. कारवाई पथकाने प्रथम एसटी डेपोजवळील एक शंकराचे मंदिर हटवण्याचे काम केले. हे मंदिर दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर, कल्याणमधील हजरत निगरानी बाबा दर्गा हटवण्यासाठी पथक पोहोचले, तेव्हा जमावाने त्याला विरोध केला. हा दर्गा पुरातन वास्तूमध्ये समाविष्ट असल्याने त्यावर कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश वक्फ बोर्डाने महापालिकेला दिले होते. तो दाखवत दर्गा कमिटीच्या सदस्यांनी विरोध केला. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई केली जात असल्याचे सांगत महापालिकेने दर्गा हटवण्याचे काम सुरू केले. त्याला जमावाने विरोध केला. एकादोन तरुणांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कारवाईच्या वेळी राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. रस्ते विकासाच्या आड येणारे शौचालयाचे बांधकामही तोडण्यात आले. आयुक्त ई. रवींद्रन हे सुटीवर आहेत. मात्र, कारवाईच्या वेळी आयुक्त महापालिका मुख्यालयात तळ ठोकून होते. कारवाईच्या ठिकाणी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते. (प्रतिनिधी)