उल्लेखनीय कामगिरीबद्दल हातोटे यांना राष्ट्रपतींचे तर भानुशाली यांना उत्कृष्ठ अन्वेषणाचे गृहविभागाचे पदक
By जितेंद्र कालेकर | Published: August 15, 2019 10:13 PM2019-08-15T22:13:10+5:302019-08-15T22:52:23+5:30
राज्यभरातील ४१ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना उल्लेखनीय सेवेचे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त हातोटे यांना हे पदक जाहीर झाले आहे. यंदा संपूर्ण ठाणे जिल्हयातून केवळ हातोटे यांनाच हे पदक जाहीर झाले आहे.
ठाणे: पोलीस सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मुकूंद हातोटे यांना राष्ट्रपतींचे तर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली यांना उत्कृष्ठ अन्वेषणाचे गृहविभागाचे पदक जाहीर झाले आहे. तर १६ अधिकारी कर्मचारी यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. या सर्वांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात बुधवारी सन्मानित करण्यात आले.
राज्यभरातील ४१ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना उल्लेखनीय सेवेचे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात ठाणे जिल्हयातील तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त हातोटे यांना हे पदक जाहीर झाले आहे. मुळ बीड जिल्हयातील रहिवाशी असलेले हातोटे हे १९८६ मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत दाखल झाले. उपनिरीक्षक ते निरीक्षक या पदावर मराठवाडयातील परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्हयातील हिंदू- मुस्लीम तसेच इतर जातीयदृष्टया संवेदनशील असेलेल्या जिंतूर, परभणी, भोकर, नांदेड अशा ठिकाणी त्यांनी प्रभारी अधिकारी म्हणून वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये यशस्वी कामगिरी केली. त्यांच्या आवाहनानंतर या भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवात गुलाल ऐवजी फुले उधळण्याची परंपरा कार्यकर्त्यांनी सुरु केली. जातीय सलोख्यावर विशेष योगदान देऊन सामाजिक शांतता व सलोखा वाढीस लागण्यासाठी सतत कार्य करुन आपल्या कामगिरीचा त्यांनी ठसा उमटविला आहे. २०१६ मध्ये उपअधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर २०१६ ते २०१९ या काळात ठाणे गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली. मीरा रोड येथील बनावट कॉल सेंटर, आर्मी पेपर घोटाळयाचे पुणे, नागपूर आणि गोवा येथील रॅकेट त्यांनी उघड केले. याशिवाय राज्यभरातील विविध पेट्रोल पंपातील भेसळही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उघडकीस आणली. त्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल आतापर्यंत ४०० बक्षिसे प्राप्त झाली आहेत.
सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी असलेल्या प्रदीप भानुशाली यांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे उत्कृष्ठ अन्वेषणाचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. राज्यभरातून ११ अधिकाऱ्यांना असे पदक मिळाले असून ठाणे जिल्हयातून हे पदक मिळविणारे ते एकमेव अधिकारी ठरले आहेत. भांडूप येथून १६ मार्च २०१८ रोजी एका पाच वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर खूनाचा प्रकार घडला होता. याप्रकरणी ठाण्यातील सुशिलकुमार झा या सुरक्षा रक्षकाला कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भानुशाली यांनी मोठया कौशल्याने अटक केली होती. आरोपीने मुलीच्या कानातील सोन्याच्या रिंगाही ओरबडल्या होत्या. मुलीला रुग्णालयात दाखल करेपर्यंत ठाणे, पालघर, मुंबई येथील पोलीस ठाण्यांमध्ये ही माहिती दिल्यानंतर त्यांनी मुलीच्या पालकांचा शोध घेतला.
त्यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे ज्या रिक्षातून तिला ठाण्यात नेले. तिचा चालक आणि त्यानंतर त्याच्या चौकशीतून या आरोपी सुशिलकुमारला त्यांनी अटक केली. ४७ दिवसांमध्ये तपास पूर्ण करुन सात महिन्यांमध्ये त्यांनी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सबळ पुराव्यामुळे ठाणे न्यायालयाने मुलीवरील बलात्कार प्रकरणी कलम ३७६ नुसार अजन्म कारावास, ३६३ अपहरण नुसार दोन वर्षाचा कारावास, जबरी चोरी ३९२ नुसार सात वर्षाची शिक्षा तसेच पोस्कोनुसार पाच वर्षांची शिक्षा अशा त-हेने अजन्म कारावासासह १७ वर्षांची शिक्षा सुनावली. तपासातील याच कौशल्याची दखल घेत भानुशाली यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. एका निरपराध मुलीवरील अत्याचाराला न्याय देतांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भानुशाली यांना समाधान व्यक्त केले आहे.
...............................
या अधिका-यांना मिळाले महासंचालकांचे सन्मानचिन्ह
गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ठाणेनगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. सावंत यांच्यासह नारपोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कल्याण घेटे, कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे हर्षद काळे, मुख्यालयाचे उपनिरीक्षक सुनिल मोरये, पोलीस हवालदार प्रदीप साळुंखे (मध्यवर्ती), हवालदार संदीप हिवाळकर (कळवा), प्रभाकर कडू (विशेष शाखा), रविंद्र बागूल (उल्हासनगर), अनिल धिवार (शांतीनगर), श्रद्धा कदम (सुरक्षा शाखा), हनुमंत शिर्के (कोळसेवाडी), नंदकिशोर पवार (चितळसर), दिनेश पाटील (विशेष शाखा, ठाणे), निता घाडगे (विशेष शाखा, ठाणे),पोलीस नाईक विजय शेजवळ (कळवा) आणि आकाश जाधव (नौपाडा) या १७ अधिकारी कर्मचा-यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री शिंदे यांनी विशेष सत्कार केला. यावेळी गेल्या वेळी मीरा रोड येथील एका तपासाबद्दल उत्कृष्ठ अन्वेषणाचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे पदक मिळविणारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनाही गौरविण्यात आले.