फेरीवाल्यांवर ‘रोखली’ बंदूक

By admin | Published: August 30, 2016 02:50 AM2016-08-30T02:50:01+5:302016-08-30T02:50:01+5:30

कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांची दिवसेंदिवस वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि रेल्वे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे

'Haul' gun on hawkers | फेरीवाल्यांवर ‘रोखली’ बंदूक

फेरीवाल्यांवर ‘रोखली’ बंदूक

Next

कल्याण : कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांची दिवसेंदिवस वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि रेल्वे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारपासून तेथे बंदूकधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे स्कायवॉक व स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दोन दिवसांपूर्वी पश्चिमेला रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या महिला फेरीवाल्यांचा माल रेल्वे महिला सुरक्षा बलाच्या विशेष स्कॉडने उचलून पोलीस ठाण्यात आणला. त्यामुळे चिडलेल्या फेरीवाल्यांनी जाब विचारण्यासाठी कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी त्यांनी विशेष स्कॉडमधील दोन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तर, दुर्गा तिवारी, शुभम मिश्रा, दिनेश व अन्य काहीजण त्यांच्या अंगावर धावून गेले. तसेच त्यांचा हात पिळून त्यांना मारहाणही केली. हा प्रकार पोलीस ठाण्याच्या आवारात घडल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वे सुरक्षा बलाचे अन्य कर्मचारी त्या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी दुर्गा आणि शुभम यांना अटक केली. मात्र, दिनेश व साथीदार तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.


रेल्वे सुरक्षा बलाच्या
पोलीस आयुक्तांची कल्याण स्थानकाला भेट
कल्याण : रेल्वे महिला सुरक्षा बलाच्या विशेष स्कॉडमधील दोन महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत फेरीवाले अंगावर धावून गेल्याच्या घटनेची गंभीर दखल रेल्वे सुरक्षा बलाचे मुंबई पोलीस आयुक्त सचिन बलोदे यांनी घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी कल्याण रेल्वेस्थानकाला भेट देत दिली.
यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानक, पादचारी पूल व स्थानक परिसरात एकही फेरीवाला बसता कामा नये, अशी सक्त ताकीद रेल्वे पोलीस बलातील सर्व कर्मचाऱ्यांना दिली. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत देण्यासाठी रेल्वेचे सर्व विभागांतील अधिकारी सहकार्य करतील, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख के.के. मिश्राही उपस्थित होते. दरम्यान, बलोदे यांच्या दौऱ्यामुळे संपूर्ण स्थानक परिसर आणि रेल्वे पादचारी पुलावर एकही फेरीवाला नव्हता.

महापालिका, रेल्वेचे पोलीस तैनात
फेरीवाल्यांकडून होणारे हल्ले आणि दादागिरी मोडीत काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने १० पोलीस व १० विशेष सुरक्षा कर्मचारी नेमले आहेत. रात्री दुप्पट कर्मचारी नेमले जात आहेत. रेल्वेनेही रेल्वे सुरक्षा बलातील पिस्तूलधारी दोन महिला व चार पुरु ष कल्याण रेल्वेस्थानक परिसरात तैनात केले आहेत.

कल्याणमध्ये फेरीवाल्यांकडून रेल्वे महिला पोलिसांना मारहाण झाली होती. या घटनेची दखल घेत रेल्वेने आज पूल फेरीवालामुक्त केला आहे. रेल्वे व पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवले पाहिजे. तरच, आम्हाला निर्धास्तपणे स्कायवॉकवरून चालता येईल.
- दीपक गुप्ता, प्रवासी

सर्वसामान्य नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पादचारी पूल बांधला आहे. मात्र, हा पूल प्रवाशांसाठी नाही तर फेरीवाल्यांसाठीच असल्याचे पाहायला मिळते. आज रेल्वेचे मोठे साहेब येणार म्हणून फेरीवाले गायब झाल्याचे समजले. त्यामुळे या साहेबांचे प्रथम धन्यवाद. त्यांनी आठवड्यातून २ ते ३ वेळा तरी स्थानकाला भेट द्यावी, जेणेकरून हा पादचारी पूल नागरिकांना अशाच प्रकारे मोकळा मिळेल.
- नेहा मिरजकर, प्रवासी

Web Title: 'Haul' gun on hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.