वन्यजीवांच्या रक्षणासाठी हवाय कायमस्वरूपी निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:24+5:302021-05-07T04:42:24+5:30
ठाणे : वन्यजीवांची सुटका केल्यानंतर त्यांचा इलाज होण्यापासून त्यांना बरे करेपर्यंत द वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनने तात्पुरते निवारा केंद्र उभारलेले ...
ठाणे : वन्यजीवांची सुटका केल्यानंतर त्यांचा इलाज होण्यापासून त्यांना बरे करेपर्यंत द वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनने तात्पुरते निवारा केंद्र उभारलेले आहे. ते पशुपक्ष्यांसाठी अपुरे पडत असल्याने कायमस्वरूपी आणि पक्के निवारा केंद्र बांधण्याचा संस्थेने निर्णय घेतला असून पैसे अपुरे पडत असल्याने संस्थेने मदतीसाठी दात्यांना आवाहन केले आहे. पावसाळ्यात होणारी पशुपक्ष्यांची गैरसोय टाळण्यासाठी दात्यांनी पुढे यावे, असेही संस्थेने म्हटले आहे.
द वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यू. डब्ल्यू.ए.) संस्थेस संकटग्रस्त प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या सुटकेसाठी व इलाजासाठी मदतीची गरज आहे. डब्ल्यू. डब्ल्यू. ए. संस्थेचे स्वतःचे तात्पुरते इलाज केंद्र आहे. जिथे संस्था वाचविलेल्या पशुपक्ष्यांस काही काळ सांभाळते, पण तिथे संस्थेला विशेषतः पावसाळ्यात खूप अडचणी येतात. म्हणून, संस्थेने कायमस्वरूपी, बळकट केंद्र बांधण्यास घेतले आहे. जिथे भरपावसाळ्यातही पशुपक्ष्यांची काळजी समर्थपणे घेता येईल. या केंद्राचा अंदाजित खर्च पाच लाख रुपये आहे. आम्ही कोणत्याही उद्योग समूहांकडून देणगी घेत नसल्याने आजपर्यंत सर्व खर्च स्वतःच्या खिशातून केला आहे, असे संस्थेचे आदित्य पाटील याने सांगितले.
संस्थेला कोरोना महामारीमुळे देणगीची चणचण भासत असल्याने वन्यजीव रक्षणाचे काम चालू ठेवणे कठीण झाले आहे. म्हणूनच, सर्व दात्यांना त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे. ज्यातून आम्ही कायमस्वरूपी वन्यजीव संरक्षण केंद्र उभारून त्यांचे प्राण वाचवू शकतो, असे संस्थेने सांगितले.
सध्या संस्थेच्या तात्पुरत्या केंद्रात ५८ वन्यजीवांचा सांभाळ सुरू आहे, पण वन्यजीव सुटकेसाठी संस्थेकडे अनेक तक्रारी येत असून त्यासाठी वाढीव निवारा निर्माण करणे आता महत्त्वाचे आहे. मागच्या वर्षी कोरोनाच्या कठीणसमयीही संस्थेने १ हजार ७०० वन्यजीव वाचवून त्यांना आपल्या महानगरात टिकण्यास मदत केली आहे. जखमी व संकटग्रस्त पशुपक्ष्यांची (सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी) सुटका करणे, त्यास वैद्यकीय साहाय्य देणे व बरे झाल्यावर त्यांना नैसर्गिक अधिवासात परत सोडणे हे संस्थेचे मुख्य कार्य आहे.
संस्थेच्या कामाची माहिती घेण्याकरिता व देणगी देण्याकरिता कृपया http://wwaindia.org/home/donate.php संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन केले आहे.