फेरीवाले-व्यापारी संघर्ष पेटला
By admin | Published: March 30, 2017 06:32 AM2017-03-30T06:32:18+5:302017-03-30T06:32:18+5:30
सुभाष पथ भागातील व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केल्यानंतर पालिकेने त्यांना हटवून ते क्षेत्र ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केले आहे
ठाणे : सुभाष पथ भागातील व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केल्यानंतर पालिकेने त्यांना हटवून ते क्षेत्र ना-फेरीवाला क्षेत्र
म्हणून घोषित केले आहे. परंतु,
आता तेथील व्यापाऱ्यांविरोधात फेरीवाले एकवटले असून त्यांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी पालिकेवर मोर्चा काढून सुभाष पथ मार्ग फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली. तसे केले नाही तर पुढील महिन्यात आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा प्रशासनाला दिला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता व्यापारी विरुद्ध फेरीवाला असा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे महापालिकेने स्टेशन परिसरातील सुभाष पथ ते जांभळीनाका या रस्त्याचे रुंदीकरण केल्याने तेथून एसटी आणि टीएमटीच्या बसेस जाऊ लागल्या आहेत. परंतु, या भागात रस्त्यावर फेरीवाले ठाण मांडून बसत
असल्याने त्याचा त्रास येथील व्यापाऱ्यांना होऊ लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी व्यापारी आक्रमक झाल्यानंतर तेथे २४ तास पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाचा जागता पहारा असतो. त्यांच्यामार्फत येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले जात असून ते नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात डम्प केले जात आहे. केंद्राच्या निकषानुसार फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही ती झालेली नाही. त्यामुळे हे धोरण तत्काळ राबवून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी बुधवारी काढलेल्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. सुभाष पथ भागातील शेकडो फेरीवाले त्यात सहभागी झाले होते. फेरीवाला धोरणाच्या अनुषगांने पालिकेने नोंदणी करून घेतली आहे. त्यानुसार, आम्हीदेखील या नोंदणीत सहभागी होऊन रक्कमदेखील भरलेली आहे. परंतु, तरीदेखील आमच्यावर कारवाई का केली जाते, असा सवाल त्यांनी केला.
तसेच सुभाष पथमार्गे जाणारी बससेवा बंद करून पुन्हा जुन्या मार्गाने सुरू करावी. जप्त केलेले साहित्य फेरीवाल्यांना तत्काळ मिळावे आणि सुभाष पथ परिसर फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी या वेळी फेरीवाल्यांनी केली. परंतु, या मागण्या मान्य न झाल्यास एक महिन्यानंतर आमरण उपोषण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)