फेरीवाल्यांच्या ‘गॉडफादर’ना धडा शिकवायला हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 01:48 AM2017-10-09T01:48:43+5:302017-10-09T01:50:28+5:30
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यानुसार, सर्वच रेल्वे पादचारी पुलांवर कारवाईचा धडाका काही दिवसांपासून सुरू झाला आहे. परंतु, केवळ रेल्वे हद्दीतच फेरीवाल्यांनी बस्तान बसवलेले नसून त्यांचा वावर स्टेशन परिसरातही वाढला आहे. ठाणे स्टेशनच्या परिसरात रेल्वे हद्दीत आणि बाहेरही फेरीवाल्यांचा उपद्रव असून वारंवार कारवाई करूनही ते हटलेले नाहीत. मनात आणले तर फेरीवाले एका दणक्यात हटवले जाऊ शकतात. परंतु, यामागे टक्केवारीची, भाड्याची, वसुलीसाखळी कार्यरत असल्याने दुर्घटनेचा विसर पडेपर्यंत कारवाई होईल. त्यानंतर, पुन्हा फेरीवाले आपल्या पथाºया पसरतील. जोपर्यंत या धंद्यातील भ्रष्टाचाराच्या साखळ्या मोडून काढल्या जात नाहीत, तोपर्यंत फेरीवाल्यांच्या उपद्रवाचे समूळ उच्चाटन अशक्य आहे.
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने काढलेल्या मोर्चात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘येत्या १५ दिवसांत फेरीवाल्यांवर कारवाई केली नाही, तर आम्ही आमच्या स्टाइलने फेरीवाले हटवू’, असा धमकीवजा इशारा दिला. त्यांच्या या इशाºयानंतर सर्वच रेल्वे पुलांवरील फेरीवाल्यांना हटवण्याचे काम सुरू झाले आहे. ठाण्यातही रेल्वे पोलिसांमार्फत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. परंतु, रेल्वेमार्फत कारवाई झाल्यानंतर फेरीवाले सॅटीसखाली आसरा घेत आहेत. सॅटीसखाली पालिकेच्या पथकाने कारवाई केली, तर पुन्हा फेरीवाले रेल्वेच्या हद्दीत ठाण मांडून बसत आहेत.
सुरुवातीला हाताच्या बोटांवर मोजण्याइतके फेरीवाले होते. हळूहळू त्यांंची संख्या वाढत गेली. रेल्वेच्या हद्दीत तब्बल १०० च्या आसपास फेरीवाले बसतात. सॅटीसखाली आणखी काही फेरीवाले पथारी पसरतात. वारंवार कारवाई करूनही फेरीवाले पुन:पुन्हा त्याच जागी बसण्याची हिम्मतच करतात. ठाणे स्टेशन हे अतिशय गजबजीचे ठिकाण आहे. रोज रेल्वेतून सुमारे साडेपाच लाख प्रवासी प्रवास करतात. दरतासाला पाच ते सात हजार प्रवाशांचा लोंढा स्टेशनमधून आत किंवा बाहेर करतो. याच ठिकाणी सॅटीसखाली रिक्षा स्टॅण्ड, टॅक्सी स्टॅण्ड, पोलीस चौकी, दुचाकींचे पार्किंग आणि अनधिकृत फेरीवाल्यांनी मांडलेले बस्तान यामुळे पादचाºयांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागतो. या भागातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत अनेकांना गुदमरल्याचा त्रास जाणवतो. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होतो.
अनेक ठिकाणी फेरीवाल्यांकडून रोजच्यारोज भाडेवसुली म्हणा किंवा हप्तावसुली केली जाते. ठाणे स्टेशन भागातील चित्र काही वेगळेच आहे. या ठिकाणी एक मोठी साखळी कार्यरत आहे. येथे फेरीवाल्याला बसायचे असेल, तर ६ फुटांना ६०० रुपये, ८ फुटांना ८०० आणि एक हजार फुटांना ११०० रुपयापर्यंत दिवसाचे भाडे वसूल केले जाते. १०० हून अधिक फेरीवाले येथे बसत असतील, तर हे भाडे वसूल करणाºयांची दिवसाची कमाई किती मोठी आहे, याचा अंदाज येऊ शकेल. रात्री ८ वाजता एक वसुली अधिकारी येथे येतो आणि प्रत्येक फेरीवाल्याकडून भाड्याची वसुली केली जाते. त्यातही रात्री भिकाºयांनादेखील रेल्वेच्या हद्दीत झोपण्याची जागा दिली जाते. या भिकाºयांकडून रोज १० रुपये आकारले जात असून पहाटे साडेपाच वाजता त्यांना उठवले जाते. सुमारे २० ते ३० भिकारी रोज या भागात रात्रीचे झोपलेले आढळतात. मागील कित्येक वर्षांपासून हा भाडेवसुलीचा बाजार रेल्वे पोलीस, स्थानिक प्रशासन, वाहतूक पोलीस आणि काही राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने खुलेआम सुरू आहे. त्यामुळेच आजवर फेरीवाल्यांवर आर या पारची कारवाई झालेली नाही.
स्टेशन परिसर आणि बाजार परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी मागील काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मोठी मोहीम हाती घेतली होती. अनेक फेरीवाल्यांना त्यांनी सिंघम स्टाइलने धडा शिकवला होता. या भागात एकही फेरीवाला बसू नये, असे आदेशही दिले होते. त्यानुसार, आजही दिवसभर कारवाई सुरू असल्याचे दिसत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाची पथके येथे कार्यरत आहेत. त्यांची गाडी कारवाईसाठी आली की, आधीच मोबाइलचा अलार्म वाजतो. कारवाईच्या भीतीने फेरीवाले काही क्षणासाठी गायब झाल्याचा देखावा करतात. परंतु, पुढल्या क्षणाला पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान बसलेले दिसते. स्टेशन परिसर ते जांभळीनाक्यापर्यंतच्या बाजारपेठेत अशा प्रकारे शेकडो फेरीवाल्यांचे जाळे कार्यरत आहे. त्यांच्याकडूनदेखील दिवसाला २०० ते ३०० रुपयांची वसुली केली जाते. काही फेरीवाल्यांचे सामान उचलल्यानंतर ते ठरावीक रक्कम देऊन सोडवले जाते. यासाठीदेखील एक महत्त्वाचा स्पॉट तयार झाला आहे. त्याच ठिकाणी ही डीलिंंग होते, असे फेरीवालेच ठामपणे सांगतात. त्यामुळे कारवाई हे नाटक असल्याने फेरीवाले मुजोर झाले आहेत. स्टेशन परिसरातील फेरीवाले शिवीगाळ, मारामारी करायला घाबरत नाहीत. एखाद्या पादचाºयाने हटकले, तर ‘जा, तुम्हाला काय करायचे ते करा, आमचे कोणीही काही वाकडे करू शकणार नाही’, अशी उद्धट उत्तरे फेरीवाल्यांकडून मिळतात. पोलिसांपासून राजकीय नेत्यांपर्यंत आणि पालिका अधिकाºयांपासून गुंडांपर्यंत साºयांच्या फेरीवाल्यांवर असलेल्या आशीर्वादाचा हा परिपाक आहे. दिवसाचे भाडे देऊनही पालिकेच्या विभागाकडून रोजची २० रुपयांची पावती या फेरीवाल्यांकडून फाडली जाते.
एकूणच पुढील काही दिवस फेरीवाल्यांवर कारवाईचा फार्स सुरू राहील. काही दिवसांनंतर पुन्हा येथे फेरीवाल्यांचे बस्तान अटळ आहे. त्यांच्याकडून हप्तावसुली करणारी साखळीच याला कारणीभूत आहे. मनसैनिकांना धडा शिकवायचा असेल, तर त्यांनी फेरीवाल्यांपेक्षा त्यांना संरक्षण देणाºया या गॉडफादरना इंगा दाखवायला हवा.
अजित मांडके, ठाणे