डोंबिवलीत फेरीवाल्यांचा रोजगार हक्क मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 02:57 PM2018-10-19T14:57:42+5:302018-10-19T15:04:19+5:30
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर परिसरातून फेरीवाल्यांना बाहेर काढण्यात आले आहे.
डोंबिवली - डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर परिसरातून फेरीवाल्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आम्हाला पर्यायी जागा दिली नाही तर आम्ही उपाशी रहायचे का? त्यामुळे जो पर्यंत पर्यायी जागा देणार नाही तो पर्यंत आम्ही तिथेच बसणार आहोत. पोलीस कारवाई झाली तरी चालेल पण आमच्या सामानाचा पंचनामा झाला पाहिजे अशी मागणी करत फेरीवाल्यांनी केडीएमसीवर शुक्रवारी (19 ऑक्टोबर) दोन तास मोर्चा काढला होता.
कष्टकरी हॉकर्स व भाजीविक्रेता युनियनच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला होता. रोजगार हक्क मोर्चाला शेकडो फेरीवाले उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी नेतृत्व करत संगितले की, व्यवसाय करणे हा आमचा हक्क आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे आजपासून आपण स्थानक परिसरात बसणारच. भले कारवाई होऊ दे, अटक होऊ दे, पण समानाचे पंचनामे करण्यात यावेत ही मागणी कांबळे यांनी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला 1 वर्षे होणार असून आद्यपही आम्हाला हक्काची जागा मिळलेली नाही. त्यात दबावतंत्र करण्यात येत आहे, हे योग्य नाही याची नोंद घ्यावी. फेरीवाल्यांना पथ विक्रेता प्रमाणपत्र (वेडिंग सर्टिफिकेट) तातडीने देण्यात यावे, तापूर्ती जागा विनाविलंब देण्यात यावा. याची अमलबजावणी झाली नाही तर मात्र आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसून तसे झाल्यास त्याची जबाबदारी ही शासनाची राहील असेही सांगण्यात आले. त्यांच्या मागण्याचे निवेदन युनियनने ग प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत याना दिले. त्यावेळी कांबळे, राजेंद्र सोनवणे, मधु बिरमोळे, आशा मगरे, नूतन रणदिवे, भाऊ पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी सांगितले की, आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणार, न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही होणे महत्त्वाचे असून त्याचे उल्लंघन कोणी करू नये, अन्यथा कार्यवाही करावी लागणारच असेही पवार यांनी स्पष्ट केले.