डोंबिवलीतील फेरीवाले बॅकफूटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 05:13 AM2018-08-31T05:13:41+5:302018-08-31T05:13:56+5:30
नागरिकांना दिलासा : रेल्वेस्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास
डोंबिवली : पूर्वेला रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटरच्या हद्दीत व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण बुधवारी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर २० फेरीवाल्यांना रामनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर शहरातील फेरीवाले बॅकफूटवर गेले आहेत. रेल्वेस्थानक परिसरात व्यावसाय न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी डॉ. राथ रोड, उर्सेकर वाडी, पाटकर रोडवरील पदपथावर एकही फेरीवाला रस्त्यावर नव्हता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आता फेरीवाले स्थानक परिसरात १५० मीटर परिसरात अजिबात बसणार नाहीत, असा सामंजस्याचा पवित्रा कष्टकरी फेरीवाला संघटनेचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच आम्ही नियमांचे पालन करू असेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते पुढे म्हणाले की, बुधवारी आमचे नियोजन सपशेल फेल ठरले. फेरीवाल्यांना आम्ही आधी शिवमंदिर रोडवर बसावे, असा सल्ला दिला होता. पी१, पी२ च्या माध्यमातून रोज जागा घ्यायची, असेही ठरवले होते. पण घडले काही वेगळेच. आम्ही स्थानक परिसर मोकळा करण्यासाठी तयार असलो तरी यापुढे त्या ठिकाणी कोणीही नवा फेरीवाला बसणार नाही, यावर आमचे लक्ष असेल. तसे झाल्यास पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी यांच्यावर न्यायालयाच्या अवमानप्रकरणी केसेस दाखल करणार आहोत.
महापौर विनीता राणे म्हणाल्या, दीड महिन्यापासून पूर्वेकडील फेरीवाला हटवावा यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. त्यात अनेक अडथळे आले होते, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्थानक परिसर मोकळा ठेवण्याचे आदेशीत केले होते. त्यानुसार आम्ही सातत्याने या सर्व फेरीवाला कारवाईचा अंदाज घेत होतो. फेरीवाला हटाव पथकाला काही अडचणी आल्या. त्या सोडवण्यासाठी तातडीने प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्याशी चर्चा करत आहोत. त्याला चांगले यश आले आहे. रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी मला नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे आणि रामनगर पोलीस ठाण्याचेही सहकार्य मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता आमचे ध्येय्य कल्याण स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याचे आहे. स्काय वॉक, शिवाजी चौकातील काही भाग फेरीवालामुक्त करणारच असेही त्या म्हणाल्या.
२० जणांना पोलीस कोठडी
च्रामनगर पोलीसांनी बुधवारी १८ फेरीवाल्यांना तर गुरुवारी दोघांना अटक केली होती. त्यात बबन कांबळे, भालचंद्र पाटील, रेश्मा कुरेशी, लक्ष्मी थेटे, आस्मा ठक्कर, नूतन रणदिवे, आशा मगरे, बाबू नायडू, सदरुद्धीन शेख, शीतला प्रसाद यादव, दीपक भालेराव, अष्टपाल कांबळे, अनंता पाटील, सिकंदर खान, जितू मल्लाहा, संदीप जयस्वाल, कांचन सिंग, हबीब शेख, संजय सिंग यांचा समावेश आहे.
च्कल्याण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सहपोलीस निरीक्षक शरद शेळके करत आहेत.